चढत्या उन्हात विश्रांती तर ऊन उतरल्यावर करतो प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:00 AM2022-03-17T05:00:00+5:302022-03-17T05:00:29+5:30
पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिवारातील एका केळीच्या बागेत असल्याचे बोलले जात असून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या चमूला त्याचे दर्शनही झाले आहे. विशेष म्हणजे हा तरुण वाघ चढत्या उन्हात प्रवास करण्याचे टाळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अडीच ते तीन वर्ष वयोगटातील एक तरुण वाघ आपला नैसर्गिक अधिवास शोधत असून त्याच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघास पुष्पा म्हणून संबोधित आहेत. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) परिसरातील शेत शिवारात असून चढत्या उन्हात विश्रांती अन् ऊन उतरल्यावर प्रवास असे धोरण अवलंबत आपल्या नैसर्गिक अधिवासाचा शोध घेत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
अडीच ते तीन वर्ष वयोगट असलेल्या या तरुण वाघाने पवनार शिवारात असताना एक गाय तर एक कालवड ठार करून त्यावर ताव मारला. त्यानंतर त्याने साळींदरची शिकार केली. पण या वन्यजीवाला त्याने पूर्णपणे फस्त केले नाही. तर आता हा तरुण वाघ येत्या २४ तासांत एखाद्या प्राण्याची शिकार करून त्यावर ताव मारेल अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ज्या परिसरात सध्या या तरुण वाघाचे वास्तव्य आहे त्या भागातील दहा गावातील नागरिकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन सूचना दिल्या जात आहेत.
पहिले गाय तर नंतर कालवडीवर ताव
- या तरुण वाघाने पवनार शिवारात असताना सुरुवातीला गाय ठार करून तिच्यावर ताव मारला. पण आपण असुरक्षित असल्याचे वाटल्याने वाघाने गाय पूर्णपणे फस्त केली नाही. त्यानंतर वर्धा नदी पार केल्यावर महाकाळ आणि पवनार शेत शिवाराच्या सीमेवर पवनार शेत शिवारातच नागटेकडीपासून काही अंतरावर याच पट्टेदार तरुण वाघाने कालवड ठार करून त्यावर मनसोक्त ताव मारला आहे. त्यानंतर पुढील प्रवास केला.
पुष्पा पोहण्यात तरबेजच
- पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिवारातील एका केळीच्या बागेत असल्याचे बोलले जात असून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या चमूला त्याचे दर्शनही झाले आहे. विशेष म्हणजे हा तरुण वाघ चढत्या उन्हात प्रवास करण्याचे टाळत आहे.
नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणाऱ्या या तरुण वाघाने पवनार ते आंजी (मोठी) पर्यंतच्या प्रवासादरम्यान कालवड, गाय व काळींदराची शिकार केली आहे. सध्यास्थितीत तो पोट भरण्यासाठी शिकारीच्या बेतात असल्याचा अंदाज असून मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष टाळता यावा या हेतूने आम्ही आंजी (मोठी) तसेच परिसरातील दहा गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. शिवाय नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत वनविभागाचे कर्मचारी ग्रामस्थांना सूचना देत आहेत.
- रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.