जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:24+5:30
एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वारंवार निवेदन देऊनही पिपरी (पारगोठान) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासह पुनर्वसित भागातील विविध प्रश्न निकाली काढण्यात आले नसल्याचा आरोप करीत विविध समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सूरज घायवट या आंदोलनकर्त्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोराने गळफास लावून ‘मला मरायचे नाही... वाचवा’ अशी आर्त हाक दिली.
एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली असता, त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा. सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसनमधील लाभार्थ्यांना मागील सहा वर्षांपासून लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. पण प्रत्यक्षात गरजूंना लाभ देण्यात आलेला नाही. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तर पिपरी पारगोठान येथील प्रकल्पग्रस्त रमेश गेटमे यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. परंतु, त्यांना अजूनही जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. या तिन्हीप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात नावेद पठाण, प्रीतम कातकिडे, सूरज घायवट, सिराज पठाण, अमित मांडरे, शुभम भोयर, भूषण येलेकार, ऋषिकेश पाचकवडे, आशिष अंभोरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका
- जिल्हा कचेरीतील आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या चमूसह आंदोलनस्थळ गाठले. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे नेले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली.
अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत उडाली खळबळ
- आंदोलनकर्त्यांनी दुपारी १२.०२ वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून घोषणाबाजी केली. दरम्यान, एका आंदोलनकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोर बांधून गळफास घेत मला वाचवा, अशी आर्त हाक दिली. एकूणच या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.