चोरीच्या लोखंडाची विल्हेवाट करायला गेले अन् पोलिसांच्या हाती लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 05:00 AM2022-06-03T05:00:00+5:302022-06-03T05:00:11+5:30
मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता चोरटे सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यास गेल्याची माहिती मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतातील चोरलेल्या लोखंडी साहित्यांची विल्हेवाट लावण्यास गेलेल्या चार चोरट्यांना सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहत परिसरातून १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील ४ लाख ९५ हजार रुपयांचे एक टन बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटा आणि नऊ मोटारपंप जप्त करण्यात आले.
अटक केलेल्यांत चेतन विठ्ठल पिंपळे, रा. येळाकेळी, मोहम्मद जमालुद्दीन शेख शराफत अली, रा. सावजी नगर वर्धा, कौशल पुरुषोत्तम लटारे, रा. येळाकेळी, मोहम्मद नदीम शेख मोहम्मद ईस्माईल शेख, रा. नागपूर यांचा समावेश आहे. मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता चोरटे सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यास गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी कर्मचाऱ्यांना घेत थेट सेवाग्राम गाठून चारही चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह बंधाऱ्याच्या १ टन प्लेटा आणि ९ मोटारपंप असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर विनोद सानप, संतोष कामडी, अशफाक शेख, बमनोटे, गिरीश चंदनखेडे यांनी केली.