चारपदरी रस्त्याने वाढविली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 10:22 PM2019-07-28T22:22:34+5:302019-07-28T22:23:21+5:30
नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
शिरपूर व सेलसूरा येथे पावसाचे पाणी बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने या गावाला तळ्याचे स्वरूप आले आहे. संततधार पावसादरम्यान पावसाच्या पाण्याची कोंडी होत अनेकाच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने चार पदरी रस्त्याचे व पुलाचे बांधकामादरम्यान गावातील पाणी बाहेर निघण्यासाठी मार्ग न ठेवल्याने तसेच ग्रा.प.ची पाणी वाहून नेणारी नाली तोडल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सरपंच रवींद्र भानारकर यांचे म्हणणे आहे.
शिरपूर गावाचे पूर्वेला उंचावर चार पदरी रस्त्याचे बांधकाम, पश्चिमेला रेल्वे मार्गाचे बांधकाम तसेच दक्षिणेला खर्डा-बोपापूर मार्ग असल्याने या तिन्ही बाजूला पावसाच्या पाण्याची कोंडी झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसादरम्यान पावसाच्या पाण्याची कोंडी होऊन पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरले. यामुळे अनेकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. काही घरात एक ने दीड फुटापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. गावाचे तुलनेत चार पदरी रस्त्याचे व रेल्वे मार्गाला बांधकाम उंचावर गेल्यामुळे तसेच याबाबत बांधकाम प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलसुरा येथील नवीन वस्तीतही हिच परिस्थिती ओढावली आहे. दिलीप बिल्डकॉनच्या चार पदरी रस्त्याचे बांधकाम गावातील घरांच्या तुलनेत उंचावर गेल्यामुळे या गावातही पावसाच्या पाण्याची कोंडी झाली. येथील नुकसानग्रस्तांना सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी आहे.