नाफेडच्या जाचक अटी ठरताय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:11+5:30
भाव देणाऱ्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाऱ्या जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ३० ऑक्टोबरपासून वर्धा जिल्ह्यात पाच ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत नाफेडने सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी केलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या जादा भाव देणाऱ्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाऱ्या जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ३० ऑक्टोबरपासून वर्धा जिल्ह्यात पाच ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत नाफेडने सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी केलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केल्याचे वास्तव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, पुलगाव, आष्टी (शहीद) आणि कारंजा (घा.) येथे नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र ३० ऑक्टोबरला सुरू करण्यात आले आहे. हे पाचही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र शासकीय सुट्टीचा दिवस वगळता तीन महिने सुरू राहणार आहेत.
वर्धा, देवळी, पुलगाव आणि आष्टी येथील खरेदी केंद्राकडे सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी एकही शेतकरी फिरकला नसल्याचे वास्तव आहे. तर कारंजा येथील केंद्रावर केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
तशी नोंदणी जिल्हा मार्केटींग विभागाने घेतली आहे. नाफेडकडून सोयाबीनला दिल्या जाणारा तोकडा भाव तसेच सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आता आद्रता असणे यासह आदी जाचक अटी सोयाबीन उत्पादकांसाठी डोकेदुखी ठरणारी असल्याने शेतकऱ्यानीही शासकीय खरेदीकडे पाठ दाखविल्याचे सध्या बोलले जात आहे.
गत वर्षी केवळ १० क्विंटल सोयाबीनची खरेदी
यंदाच्या वर्षी आतापर्यंत नाफेडच्या पाचपैकी एकाही केंद्रावर सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी करण्यात आलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्यांने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाफेडने वर्धा येथील केंद्रावरून केवळ १० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली होती.
सोयाबीनला नाफेड देतेय ३,७१० भाव
जिल्ह्यात नाफेडचे पाच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता यासह विविध अटींची पूर्तता होत असल्यास सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ७१० रुपये भाव दिल्या जात आहे. असे असले तरी नाफेडच्या पाचही खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या एकाही दाण्याची अद्याप खरेदी झालेली नाही.
व्यापाऱ्यांकडून दिवाळी बोनस पिकास समाधानकारक भाव
शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये सध्या १४ ते १८ टक्केपर्यंत आद्रता असल्याचे दिसून येत असले तरी सोमवारी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला ३ हजार ७५० इतका सर्वात जास्त भाव देण्यात आला आहे. नाफेडकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा ४० रुपये जादा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
परतीच्या पावसामुळे सोयाबीनमध्ये आद्रता जास्त
दिवाळी सण साजरा होत असतानाच जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन मळणीच्या कामाला गती दिली. शिवाय सोयाबीन थेट बाजारपेठेत विक्रीसाठी नेले. ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन वाळविण्यासाठी वेळच मिळाला नाही. बाजारपेठेत सध्या विक्रीसाठी येणाऱ्यां सोयाबीनमध्ये १४ ते १८ टक्के आद्रता असल्याचे दिसून येत आहे. तर पूर्वी १५ ते २१ टक्केपर्यंत आद्रता विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनमध्ये होती. साठवणुक केल्यानंतर वजन घटेल. शिवाय भविष्यात भावही पडेल याच भीतीमुळे सध्या सोयाबीन उत्पादक आपल्याकडील सोयाबीन थेट बाजारपेठेत नेत व्यापाºयांना विकत असल्याचे बघावयास मिळत आहे.