वैद्यकीय अधिकाऱ्यांविना आरोग्य केंद्र
By Admin | Published: September 12, 2015 01:57 AM2015-09-12T01:57:40+5:302015-09-12T01:57:40+5:30
सर्वत्र आजारांनी थैमान घातले आहे. असे असतानाही सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ पाहावयास मिळतो.
सालई (कला) आरोग्य केंद्र : ३७ पैकी ११ जागांची स्थायी पदे रिक्त, आरोग्याचे तीनतेरा
बोरधरण : सर्वत्र आजारांनी थैमान घातले आहे. असे असतानाही सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ पाहावयास मिळतो. येथील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेवकांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे रूग्णाची गैरसोय होत असून त्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सालई (कला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ढिसाळ कारभार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. सालई आरोग्य केंद्र बोर अभयारण्यातील जंगल व्याप्त भागात आहे. या भागात नेहमी हिस्त्र प्राण्यांचे वास्तव्य असते. वर्षापासून येथील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. सोबतच आरोग्य सेविका आणि आरोग्य सहाय्यकाचे स्थायी पदही रिक्त आहे.
शासन आरोग्यसेवेवर लाखो रूपये खर्च करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. ग्रामीण भागातील रूग्णांवर गावातच उपचार व्हावे हा प्रमाणिक उद्देश यामागे असतो. सालई (कला) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर नवरगाव, गरमसूर येथे आरोग्य उपकेंद्र आहे. ही तिनही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून अतिदुर्गम अशा जंगल व्याप्तभागात आहे. या दोन्ही उपकेंद्रात आरोग्य सेविका पद रिक्त आहे. येथील नागरिकांना जंगल व्याप्त भागातून ये जा करावी लागते. सालई येथे उपचारासाठी येताना खासगी वाहनांचा आधार नसतो. बससाठी ताटकळत बसावे लागते किंवा पायी जावे लागते. तसेच बोरी बोरधरण उपकेंद्रातहेही आरोग्य सेविका पद रिक्त असल्याने येथील रुग्णांना व येणाऱ्या पर्यटकांना दुकापत व किरकोळ आजार झाल्यास हिंगणी येथे पाच कि़मी. अंतरावर येवून उपचार घ्यावा लागतो. सालई, पेवठ येथील आयुर्वेदिक दवाखान्यातील शिपाई व आरोग्य उपकेंद्रामधील आरोग्य सेविका पदही रिक्त आहे. तसेच हिंगणी, मोई, घोराड येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक पदही रिक्त आहे. याचा विपरित परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतो.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा याकरिता शासनाने ग्रामीण भागात सक्षम अशी आरोग्य यंत्रणा उभी केली आहे. मात्र अनेक पदे रिक्त असल्यामुळे या सुविधेला खीळ बसत आहे. रिक्त पदामुळे अतिरिक्त उपस्थित कर्मचारी वगाआला सोसावा लागत असल्याने नेमके कोणते काम करावे असा प्रश्न त्यांना पडतो. यातच रूग्णालयात आलेल्या रूग्णांना नाहक मनस्तापाला सामोरे जाव लागते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते संताप व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)
आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावे प्रभावित
सालई (कला) येथील आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावांचा समावेश आहे. यानध्ये नवरगाव, हेटी, गरमसूर, आमगाव, सोंडी, हेटी, सालई पेवठ, गोहदा, बोरी, बोरधरण, हिंगणी वानरविहरा, धामणगाव, देवनगर, शिवनगाव, मोई, किन्ही ब्राह्मणी, घोराड, खापरी, नानबर्डी, डोंगरगाव, इत्यादी गावे आहेत. त्यामुळे या सर्व गावांतील आरोग्यसेवा प्रभावित झाली आहे.
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली
सालई कला आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावखेड्याचा समावेश आहे. आरोग्य उपकेंद्रामध्ये पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. परिणामी शासनाचा उद्देशानुसार नागरिकांना देण्यात येणारी आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
हिंगणी येथून जि.प. सर्कलमधून निवडून आलेल्या चित्रा रणनवरे या सध्या जि.प. अध्यक्ष तर राणा रणनवरे हे जि.प. सदस्य आहे. ते दोघेही सालई (कला) गावचे असतानाही येथील आरोग्य केंद्राचे हाल आहे.
हिंगणी येथील आरोग्य सेवकाला डेप्युटेशनच्या नावावर वर्धा येथे पाठवण्यात आले. तसेच सालई पेवठ येथील आयुर्वेदिक दवाखान्यातील शिपायालाही डेप्यूटेशनच्या नावाखाली झडशी केंद्र देण्यात. त्यामुळे ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहेत. हिंगणी, मोई, किन्ही, ब्राह्मणी, घोराड ही गावे नदीकाठावर असल्याने जोखमीची गावे समजली जातात. असे असतानाही येथील आरोग्य सेवकाचे पद रिक्त कसे हे एक कोडेच आहे.