६० शिबिरातून दोन लाख नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:19 AM2017-07-21T02:19:19+5:302017-07-21T02:19:19+5:30
जिल्हा परिषद, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री आरोग्य मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.
सुधीर दिवे यांची पत्रकार परिषदेत माहिती : वर्धेत २२ पासून मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषद, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री आरोग्य मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. येत्या २२ जुलै पासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यात राबविण्यात येत असलेल्या ६० शिबिरातून सुमारे दोन लाख नारिकांच्या आरोग्याची तपासणीचा मानस आरोग्य मॅराथॉनचे मुख्य आयोजक सुधीर दिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी आरोग्य मॅराथॉनचे मुख्य संरक्षक खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, पशु व कृषी विभागाचे सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री मॅराथॉनदरम्यान आरोग्य तपासणी शिबिरात दुर्धर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजना, मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार आहे. ही आरोग्य मॅराथॉन सणांचे दिवस वगळता एकूण ६३ दिवस चालणार आहे. अंतिम शिबिर २४ सपटेंबर रोजी वर्धेत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित राहतील अशी माहिती दिवे यांनी दिली.
आरोग्य तपासणीकरिता सावंगी मेघे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यासह सारथी बहुउद्दशिय संस्था, मातोश्री आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई येथील तज्ज्ञांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती आहे. शिवाय या आरोग्य शिबिरात कॅन्सरची विशेष तपासणी होणार आहे. याकरिता २० दिवस मुंबई येथील कॅन्सर तज्ज्ञ वर्धेत दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रात होत असलेल्या शिबिराचे उद्घाटन २२ जुलै रोजी हिंगणघाट-समुद्रपूर येथील कांढळीत होणार आहे. या शिबिरात नागरिकांच्या सहभागाकरिता बसगाड्यांची व्यवस्था आहे.
मॅराथॉनच्या आयोजनाची माहिती मुख्य आयोजक अविनाश देव यांनी दिली. त्यांनी आरोग्य मॅराथॉनकरिता जिल्हाभर फिरून १,३०८ गट तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी आमदार दादाराव केचे, सुनील गफाट यांच्यासह भाजपाचे पदधिकारी उपस्थित होते.