आरोग्य मंत्र्यांकडून ट्रामा केअर युनिटची पाहणी
By admin | Published: March 21, 2016 01:55 AM2016-03-21T01:55:20+5:302016-03-21T01:55:20+5:30
येथील महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटची राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी
हिंगणघाट : येथील महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटची राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यांना या युनिटची माहिती आ. समीर कुणावार यांनी दिली. यावेळी त्यांनी इमारतीत असलेल्या त्रुटी दूर करण्याचे निर्देषही दिले. सदर युनीटचे लोकार्पण लवकरच करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अपघाती रुग्णांना मदत मिळावी याकरिता नागपूर, चंद्रपूर, पांढरकवडाच्या मध्यभागी राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाट येथे ट्रामा केअर युनीटची घोषणा केली होती. नंतर मात्र शासन बदलताच सदर युनीट पांढरकवडा येथे हलविण्यात आले. २०१० मध्ये तत्कालीन आमदार अशोक शिंदे यांनी सदर युनीट पुन्हा हिंगणघाटला खेचून आणत ६५ लक्ष रुपयांचा निधी आणला. आता ही इमारत पुर्णत्वास आली आहे. या ट्रामा केअर युनीटच्या इमारतीत तांत्रिक बाबीच्या कारणावरून आरोग्य विभागाने ही इमारत ताब्यात घेतली नाही. या युनीटच्या त्रुटीसाठी आ. समीर कुणावार यांनी पुढाकार घेत अनेक बाबींची पुर्तता केली. आता केवळ लोकार्पण सोहळा घेण्याची गरज आ. कुणावार यांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्या समक्ष मांडली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय व नवीन इमारतीची पाहणी केली.
यावेळी माजी आमदार अशोक शिंदे, किशोर कान्हेरे, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. रुईकर, औषधी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र खुपसरे, श्रीधर कोटकर, शंकर मोहमारे, मुन्ना त्रिवेदी, प्रकाश अनासने, बाळु वानखेडे, सतीश ढोमणे, विनोद वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची दशा, रुग्णव्यवस्थेची, जेवणाचे सुक्ष्म निरीक्षण केले. ट्रामा केअर युनीट मधील त्रुटी नियमित वीज पुरवण्यासाठी एक्सप्रेस फिडरची जोडणी, आकस्मिक वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था, शल्य गृहातील टाईल्स जोडणीची दुरुस्ती, नळजोडणी दुरुस्ती आदीबाबत लक्ष देण्याचे संबंधितांना निर्देश दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)
ट्रामा केअर युनिटकरिता अधिकाऱ्याची नियुक्ती
४या उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन निरीक्षण केल्यानंतर आरोग्य मंत्री सावंत यांनी ट्रामा केअर युनीटसाठी एक अस्थीरोग तज्ज्ञ, एक भुलतज्ज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी यांची स्थायी नियुक्ती त्वरीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त प्रसुती तज्ज्ञ, अस्थीरोग तत्ज्ञ, बाळरोग तज्ज्ञ ही पदे स्थायी स्वरूपात भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयाची मागणी आल्यास सोनोग्राफी व एक्सरे मशीन देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. वेतनाच्या कमतरतेमुळे शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास कुणी तयार नसल्याने शासकीय महाविद्यालय व विद्यार्थी संख्या वाढविल्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आ. समीर कुणावार, किशोर दिघे, प्रा. किरण वैद्य, प्रफुल्ल बाडे, चंद्रकांत माळवे, विठ्ठल गुळधाने, आकाश पोहाणे, शंकर यंकेश्वर, अंकुश ठाकुर, कमलाकर, येसनसुरे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.