आरोग्य यंत्रणा ‘आॅन दि स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:43 PM2018-10-23T23:43:59+5:302018-10-23T23:44:59+5:30
ग्रामीण भागात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही, अशी ओरड होत आहे. त्यामुळे यातील वास्तविकता जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यांनी अधिकाऱ्यांसह सोमवारी आकस्मिक दौरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही, अशी ओरड होत आहे. त्यामुळे यातील वास्तविकता जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यांनी अधिकाऱ्यांसह सोमवारी आकस्मिक दौरा केला. त्यांनी ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ उपकेंद्रांना भेटी देऊन ‘आॅन दि स्पॉट’ वास्तव जाणून घेतले. या धडक दौºयाने आता आरोग्य यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनाही चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. प्रत्येक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात २७ आरोग्य केंद्रे, ११ आयुवेर्दीक व २१ अॅलोपॅथीक केंद्रे आहे. तसेच १८१ आरोग्य उपकेंद्र आहेत. या सर्वांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याची अपेक्षा असतांनाच ग्रामीण भागात अधिकारी,कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक छळा सोसाव्या लागतात, अशी नेहमीच ओरड होत असल्यामुळे आरोग्य केंंद्र व उपकेंद्रातील रात्रीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी रोहणा, गिरोली, कानगाव, अल्लीपूर व तळेगाव या पाच प्राथमिक आरोग्य कें द्रांना आणि आकोली व विरुळ या दोन उपकें द्रांना आकस्मिक भेट देऊन वास्तविकता जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, वर्धेच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, मुख्य औषध निर्माण अधिकारी सोज्वळ उघडे यांची उपस्थिती होती.
असे घडले वास्तव दर्शन
या आकस्मिक दौऱ्या दरम्यान सुरुवातील सेलू तालुक्यातील आकोलीच्या आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता रात्रीच्यावेळी उपकेंद्र कुलूपबंद दिसून आले. तसेच अधिकाऱ्यांचे निवासस्थानही बंद होते. सोबतच गिरोली, रोहणा येथील आरोग्य केंद्राला भेट दिली असता या दोन्ही आरोग्य केंद्रामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारीच अनुपस्थित आढळून आले. विशेषत: आकोली वगळता सर्वच ठिकाणी सुरळीत सुविधा मिळत असल्याचे निदर्शनास आले. रोहणा व अल्लीपूर येथे महिला वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर होत्या. सोबतच रोहणा, विरुळ, गिरोली, कानगाव, अल्लीपूर व तळेगाव कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून आल्याने या दौºया दरम्यान कुठे कर्तव्यतत्परतेचे तर कुठे कामचुकारपणाचे दर्शन घडून आले. यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांशी व रुग्णांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून ती भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. आकस्मिक भेटीदरम्यान आकोली वगळता इतर ठिकाणी आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे दिसून आले. नागरिकांची होत असलेली ओरड लक्षात घेऊन हा दौरा काढण्यात आला. यापुढेही सातत्याने पाहणी केली जाईल.
जयश्री गफाट, सभापती, आरोग समिती जि.प.वर्धा
आरोग्य व्यवस्थेतील वास्तविकता जाणून घेण्यासाठी पाच आरोग्य केंद्र व दोन आरोग्य उपकेंद्रांना आकस्मिक भेटी देण्यात आल्या. यादरम्यान मुख्यालयी आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आढळून आली. त्यांच्यावर प्रशासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल.
डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
सभापती व अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आकस्मिक भेट देवून कामकाजाची पाहणी करण्यासोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. बहुतांश ठिकाणी रिक्त पद असल्याने कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांवर भार वाढत असल्याचेही या दरम्यान निदर्शनास आले. याही परिस्थितीत सुरळीत आरोग्य देण्यावर भर दिसला.