श्रवणच्या उपचाराकरिता शेतमजूर कुटुंब हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:24 AM2017-08-28T00:24:17+5:302017-08-28T00:24:38+5:30
लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च सांगितल्याने त्याच्या आईवडिलासह गावकरी हतबल झाले आहे.
देवा श्रवणला लवकर बरे कर, म्हणत लहानआर्वी वासीयांनी श्रीरामाला प्रार्थना केली आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी श्रवणच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची मागणी त्याच्या आई वडिलांनी केली आहे. लहानआर्वी येथील घनश्याम गायकी हे भूमिहीन कुटुंब, शेतमजुरी करून ते, पत्नी, मुलगा व मुलगी असा संसार चालवित होते. मुल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. अत्यल्प मजुरी या परिवाराच्या दोन वेळची भुक भागविण्याकरिता पुरेसी ठरत होती. सर्व सुरळीत असताना घनश्याम यांचा मुलगा श्रवण अचानक हाताच्या दुखण्याने रडू लागला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी मोठा आजार आहे म्हणत अमरावती नेण्याचा सल्ला दिला. तेथे पूर्ण निदान लागले. श्रवणच्या हातामधील मोठ्या हाडात कॅन्सर झाला आहे. हे ऐकूण आईवडील ढसाढसा रडत श्रवणला घेवून लहानआर्वी आपल्या घरी आले. नातलगांना सांगितले. गाकºयांसामोर आपबिती कथन केली.
सर्वांच्या लाडाचा श्रवण एकाएकी अंधरुणावर खिळला, सारे गाव सुन्न झाले. सरपंच सुनील साबळे यांनी श्रवणच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. श्रवणवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याकरिता पाच लाखांचा खर्च आहे. एवढी रक्कम आणायची कुठून या चिंतेने कुटुंबाला ग्रासले.
गावातील काहींनी मदतीचा हात देवू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते व समाजातील दानशुरांनी श्रवणच्या शस्त्रक्रियेला मदत करून हातभार लावावा, असे वडील घनश्याम यांनी आवाहन केले आहे.
पहिली मदत गावकºयांनी केली
श्रवणसाठी गावकºयांनी आर्थिक मदत करून नागपूरला भरती केले. सर्व उपचार करून झाले. आता शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे पाच लाख एवढी रक्कम उभी करण्याचे आवाहन आहे. श्रवणचा आजार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास काही विपरीत घडू शकते. त्यासाठीच सर्वांचा आटापिटा सुरू आहे.