‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:11+5:30
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले.
प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : ‘पैसा आणि संपत्ती’ हे रक्ताच्या नात्यालाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशी परिस्थिती नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने निर्माण केली आहे. या महामार्गामुळे सेलू तालुक्यातील बहीण-भावांच्या पवित्र नात्यातही अंतर निर्माण झाले आहे. आता महामार्ग पूर्ण झाला खरा; पण ही दुभंगलेली मने अद्यापही जुळली नाही. या भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहिणींमधील रुसवे फुगवे कायम असल्याने नात्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले. समृद्धी महामार्गाचा मोबदला उचलताना विवाहित बहिणी आडव्या आल्यात. त्यांनी हिस्सा-वाटणीची मागणी केल्याने नात्यांमध्ये वितुष्ट आले. जमिनीचा कोट्यवधीचा मोबदला बघून अनेकांनी ‘मी ही वारसदार’ असा कांगावा सुरू केला. समृद्धी महामार्ग विभागाने शेतीचे विक्रीपत्र करून घेतले त्यावेळी काही बहिणींनी त्यास विरोध केला. त्यामुळे कायदेशीर भावांनाच मोबदला देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे चारभिंतीच्या आतील वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आणि बहीण-भावाचे नाते कायमचे दूर झाले. यातुनच दरवर्षी दिवाळीनिमित्ताने भाऊबिजेला माहेरी, भावाकडे येणारी बहीण गेल्या दोन वर्षांपासून फिरकलीच नाही. यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने ‘या महामार्गामुळे दोन शहरांमधील अंतर कमी करून शेतकऱ्यांना समृद्ध केले; परंतु रक्तांच्या नात्यांमध्ये कायमचे अंतर वाढवून घराघरात वाद निर्माण केले’ असे मत आता व्यक्त व्हायला लागले आहे.
तिसऱ्यावर्षीही अंतर कायम
पैशामुळे बहिणीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या भावाच्या मनातील बहिणीबद्दलचा आदर संपला. काही बहिणींनी पैशाला नाकारून बहीण-भावाच्या नात्याला महत्त्व दिल्याने भावांनीही स्वमर्जीने बहिणींना ओवाळणी म्हणून मोठी रक्कम दिली. मात्र, काहींचे संबंध ताणल्या गेले ते कायमचेच. सलग तिसऱ्या वर्षीही नात्यातील अंतर कायमच असल्याने हा महामार्ग नात्यात वैरी ठरला आहे.