उष्णतामानाने व्हायरल फिव्हरच्या रुग्णांत वाढ
By admin | Published: April 9, 2015 02:55 AM2015-04-09T02:55:55+5:302015-04-09T02:55:55+5:30
सध्या जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागला आहे़ सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेल्याने जीवाची काहिली होत आहे़ ...
पुलगाव : सध्या जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागला आहे़ सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा ४० च्या वर गेल्याने जीवाची काहिली होत आहे़ वाढत्या उष्णतामानामुळे ताप, सर्दी, पडसा, खोकला, घसादुखी आदी विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे़ व्हायरल फीव्हरच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे़ वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ वाजेपासून रस्ते भकास होतात़ तापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्री वाढली असून रसवंत्या हाऊसफुल्ल आहे़ रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्याही सुगीचे दिवस अनुभवत आहे़
विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा काळ असला तरी पंखे, कुलरच्या गारव्यात युवा मंडळी दुपारी घरीच राहणे पसंत करतात़ वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने टरबूज, अननस, अंगूर, खरबूज यासारख्या पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळांची तसेच काकडी, निंबू, पालेभाज्या यांचीही मागणी बाजारात वाढल्याचे चित्र आहे़ फळांचा राजा आंबासुद्धा बाजारात डेरेदाखल झाला आहे़ १०० ते १४० रुपये किलोप्रमाणे बैंगणफल्ली, हैद्राबादी, लालबाग आंबा उपलब्ध होत असल्याचे दिसून येते़ सध्या बाजारात कार्बाईड रसायनात पिकविलेली फळे विक्रीस आली असून संबंधित यंत्रणेची डोळेझाक होत असल्याचे दिसते़
वाढत्या तापमानात काकडी टरबूज, अंगूर ही फळे वापरल्याने पाण्याची कमतरता भरून काढणे शक्य आहे़ जलजन्य फळांची वाढती मागणी लक्षात घेता बाजारात फळविक्रेते सर्वच प्रकारची फळे विक्रीस ठेवून ग्राहकांची गरज भागवित असल्याचे दिसते़ टरबूज-खरबूज ४० रुपये, अननस ८० ते १०० रुपये प्रती नग, अंगूर १०० रुपये, शहाळे ५० ते ६० रुपये प्रती नग तसेच काकडी ३० ते ४० रुपये प्रती किलो तर पालेभाज्या ३० ते ४० रुपये किलो अशी भाववाढ झाल्याचेही बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले़ कार्बाइडयुक्त सर्वच फळे उपलब्ध असली मगजदार पिवळी टेंभर, आंबटगोड चवीच्या खिरण्या बेपत्ता आहेत़ यामुळे आरोग्याला रानमेवा मिळणे कठीण झाले असून फळांचे खवैय्ये रानमेव्यापासून वंचित झाले आहे़
वाढत्या उन्हामुळे डोक्याला बांधावयाचे दुपट्टे, स्कार्फ, टोप्यांची मागणी वाढली असून लांब हैद्राबादी दुपट्ट्यांचे दर २२५ ते २५० रुपये झाले आहेत़ डोळ्याचे उन्हापासून संरक्षण करणाऱ्या सनगॉगलसची विक्री उन्हामुळे वाढली आहे़ या गॉगल्सच्या आॅनलाईन खरेदीलाही युवामंडळीचा प्रतिसाद मिळत आहे़ वाढत्या उष्णतामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याने अधिक उन्हात जाण्याचे टाळले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ञ व्यक्त करतात़(तालुका प्रतिनिधी)