पुलगावकरांना स्वर्गीय सुरांचा नजराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:48 PM2018-03-18T23:48:18+5:302018-03-18T23:48:18+5:30
चैत्रपालवीतून वाहणारा प्रभात समयीचा मंदवारा, फुलांची उधळण, असंख्य संगीत रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि सूर्यकिरणांची सोनेरी पहाट.
ऑनलाईन लोकमत
पुलगाव : चैत्रपालवीतून वाहणारा प्रभात समयीचा मंदवारा, फुलांची उधळण, असंख्य संगीत रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि सूर्यकिरणांची सोनेरी पहाट. अशा मंगलदायी वातावरणात सारेगामा संगीतमाळेचे कंठमणी ठरलेले चैतन्य कुळकर्णी, सायली सांभरे, किशोर अगडे या सूरभास्करांनी चैत्र पहाटेला एकाहून एक सरस मराठमोळी भक्तीगीत अभंग, गझल, लावणी, गौळण अशा गीतांचा नजराणा सादर करून पुलगावकरांच्या हृदयाची तार छेडली.
स्थानिक दिनदयाल चौकात संस्कारभारती पुलगाव आणि विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गुढीपाडवा उत्सवाचे निमित्ताने सारेगामा फेम गायक व दुरदर्शन मालिकेची अभिनेत्री व गायिका सायली सांभारे या गायवकांच्या पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष शितल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी तसेच आयोजक पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रामाला प्रारंभ झाला. या स्वरांच्या मैफलीचा प्रारंभ सूर निरागस हो गणपती या चैतन्य कुळकर्णीच्या गणेश वंदनाने झाला तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल हे भक्तीतगत सायली सांभारे या गायिकेने सादर करून चैत्रपहाट भक्तीमय केली रांगोळ्यांनी सडे सजवित उष:काल जाहला ही भूपाळी गायक किशोर अगडे यांनी सादर करून प्रभात समयीच्या मंगल वातावरणाची निर्मिती केली तर निघाले घेवून दत्ताची पालखी व अबीर गुलाल उधळीत रंग हा नाथीचा अभंग चैतन्य कुळकर्णी यांनी सादर करून आपली गायकनावरची पकड सिद्ध केली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली ही सुरेश भटांची गझल सायली सांभारेच्या सुरेल स्वरातून सादर झाल्यावर उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर तिनेच रेशमांच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी ही लावणी सादर करून श्रोत्यांना अस्सल मराठमोळ्या प्रांतात नेवून सोडले. हरीने गवळींना ठगविले ही मराठी कोणी कन्नड, गुजराती, तामीळ, अशा बहुरंगी भाषेची मिश्रसंगीताची राग दरबातिची गवळठा किशोर अगडे या उमद्या गायकाने गावून रसिकांची प्रभात मंतरून टाकली.
एकाहून एक सरस भावगीत, अभंग, गझल, लावणी तसेच बंदीरा सुरेश आवाजात संगीताच्या साथीसह सादर करून पाडवा पहाट उजळून टाकली. सजल नयनीत धार बरसती या गिताच्या स्वरतुषांरांनी स्वरमैफलीची सांगता झाली. यावेळी संस्कार भारतीचे बबन बरबड, सुबोध चाचणे, विवेकानंद पंतसंस्थेचे डॉ. प्रकाश हनवंते, सुरेश गणेशपूरे, शैलजा सुदामे, अनील पांडे, नितीन बडगे, यांच्सासह संघतालुकाप्रमुख विजय निवल, उपाध्यक्ष आशिष गांधी, केशराव दांडेकर, किशोर गव्हाळकर व रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी नगर परिषद व भाजपा शाखेने नागरिकांना गुढीपाडव्या निमित्त साखरपानाचे वितरण केले.