प्रखर उष्णतामानाचा पशुपक्ष्यांना फटका; चिमण्यांचा होतोय मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:24 AM2019-04-13T11:24:49+5:302019-04-13T11:25:18+5:30
एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. उन्हाची दाहकता इतकी आहे की त्याच्या तडाख्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होत आहे. झडशी परिसरात उन्हामुळे काही चिमण्या दगावत असल्याचे चित्र आहे.
चिमण्यांकरिता काही नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कृत्रिम घरटी निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता डब्यामध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचे सहकार्य सर्व नागरिकांना करावे लागणार आहे. तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.
उन्हामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांना बसू लागला आहे. अधिक तापमान चिमण्यांसारख्या इवल्याशा जिवांना सहन होत नाही. उष्णतामान वाढताच चिमण्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत चिमण्यांकरिता आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवणे गरजेचे आहे.
याशिवाय मातीच्या भांड्यात पानी व तांदळाचे दाणे टाकल्यास त्यांना जीवनदान मिळू शकेल. दिवसेंदिवस होणारी झाडांची कत्तल पाहता त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय उच्दाबाच्या वीजवाहिनी आणि मोठमोठे मोबाईल, टॉवर उभारण्यात आल्याने पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
एप्रिलमध्येच मे हिटचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. त्यापूर्वी पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांसोबतच पक्षिमित्रांनी पुढाकार घ्यावा, तरच चिमण्यांचे अस्तित्व दिसेल, असे बोलले जात आहे.