वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 04:56 PM2022-07-23T16:56:20+5:302022-07-23T18:42:29+5:30
काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.
वर्धा : दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावत शनिवारीही आपला जोर कायम ठेवल्याने नदी व नाल्यांच्या पाणी पातळीच चांगलीच वाढ झाली. अशातच काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले.
सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील नदी व नाले ओसंडून वाहत असतानाच पूराचे पाणी आष्टी तालुक्यातील लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर आणि धाडी या गावात शिरले. यामुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली.
तीन महिलांसह चार पुरुषांना केले सुरक्षित रेस्क्यू
समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्ये पुरामुळे तब्बल सात व्यक्ती अडकल्या. या बाबतची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच युद्धपातळीवर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्थानिक चमूच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या बचाव कार्यादरम्यान तीन महिला व चार पुरुषांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेल्या या व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी लाहोरीकडे जात होते. अशातच कार पुरामुळे पुलावर अडकली. तर नागरिकांच्या सहकार्याने स्थानिक चमूने शर्थीचे प्रयत्न करून दादाराव निघोट, तुळशीदास निघोट, शांताराम निघोट, सुरेश देशमुख, रमाबाई निघोड, ज्योती उखळे, गौरी निघोट, प्रमाद जोशी यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.
हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांनाही फटका
सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील जाम नदी ओसंडून वाहत आहे. ओसंडून वाहत असलेल्या जाम नदीच्या पुराचे पाणी चार गावांत शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. तर सततच्या पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून शेतशिवारांना तळ्याचेच स्वरूप आले आहे.
निम्न वर्धाचे २३ दरवाजे उघडले
आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे २३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून वर्धा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुलावर पाणी, वाहतूक ठप्प
आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यशोदा नदी ओसंडून वाहत असून पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर-अलमडोह या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर पूरपरिस्थितीमुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड), गिरड-मोहगाव, वडगाव-पिंपळगाव या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. आष्टी तालुक्यातील सुजातपूर-भारसवाडा या मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर पूरपरिस्थितीमुळे आष्टी-मोर्शी, चित्तूर बेलोरा-जळगाव, लहान आर्वी-अंतोरा हा मार्ग बंद झाला.
पेठअहमदपूर अन् आष्टीला फटका
आष्टी तालुक्यातील लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी थेट नदी काठावरील आष्टी पेठअहमदपूर या गावात शिरल्याने तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.