चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:32 AM2017-07-20T00:32:16+5:302017-07-20T00:32:16+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री
रात्रभर मुसळधार : सात गावांचा संपर्क तुटला, तीन रस्ते बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री कोसळलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. रात्रभर आलेल्या पावसामुळे चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला होता. सोनेगावचा रस्ता वाहून गेला तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा ठप्प झाला होता.
मंगळवारी रात्री जिल्ह्यात ५०१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात १०५.२० मिमी झाला. समुद्रपूर तालुक्यात ९८ मिमी, देवळी ७२ मिमी तर वर्धा तालुक्यात ६५.८० मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय सेलू तालुक्यात ६२ मिमी, आर्वी ३६ मिमी, आष्टी (श.) ३३.२० मिमी तर कारंजा तालुक्यात २९.६० मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला. या पुरामुळे वायगाव-राळेगाव मुख्य मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे सरूळ, चना (टाकळी), सोनेगाव (बाई), आलोडा, बोरगाव, निमसडा, पात्री, ममदापूर या गावांसह अन्य गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरून पाणी असल्याने राळेगाव-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीला लागून असलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे चना (टाकळी) येथील पूल वाहून गेला. यामुळे ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यानंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची पिके बचावली. जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नव्हता. मंगळवारी रात्री मात्र जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचे आगमन झाले. रात्री ११ वाजतापासून सकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. परिणामी, जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.