वर्धा जिल्ह्यात कोसळधार; सात जलाशये हाऊसफुल्ल, पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 01:56 PM2022-07-27T13:56:11+5:302022-07-27T13:56:22+5:30
नदी, नाले फुगल्याने वाहतूकही प्रभावित
वर्धा : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलाच कहर केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून सकाळपर्यंत पाऊसधारा सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशयांपैकी सात जलाशये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने काही भागातील वाहतूकही प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७०४.० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वत्र अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या बारा ते पंधरा वर्षांत असा पाऊस पहिल्यांदाच पाहिल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट आले होते. आता पावसामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले असून, शेतातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. शेतशिवार जलमय झाले असून, ना निंदण, ना फवारणी, ना डवरणी असल्याने गवत पिकांचे वर आले आहे. आता शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून, पाऊस गेल्यानंतर पिके पिवळे पडून मरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने कसलाही विलंब न करता ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
लघू प्रकल्पही ओव्हर फ्लो
जिल्ह्यातील सुमारे २० लघू प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामध्ये कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा-१ व रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी यांचा समावेश असून टाकळी बोरखेडी प्रकल्प ६८.२७ टक्केच भरला आहे.
अशी आहे प्रकल्पांची स्थिती
प्रकल्पाचे नाव - पाणीपातळी
- बोर प्रकल्प - ६९.५४ %
- निम्न वर्धा प्रकल्प - ६२.७६ %
- धाम प्रकल्प - १००.०० %
- पोथरा प्रकल्प - १००.०० %
- पंचधारा प्रकल्प - १००.०० %
- डोंगरगाव प्रकल्प - ९५.२३ %
- मदन प्रकल्प - १००.०० %
- मदन उन्नई धरण - १००.०० %
- लाल नाला - ५६.०५ %
- वर्धा कार नदी प्रकल्प - १००.०० %
- सुकळी लघू प्रकल्प - १००.०० %