मुसळधार पावसाने नदी काठची गावे प्रभावित
By admin | Published: July 1, 2017 12:39 AM2017-07-01T00:39:55+5:302017-07-01T00:39:55+5:30
परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठातील गावे प्रभावित झाली आहेत.
ठेंगण्या पुलामुळे अडचण : शेतांना आले तळ्याचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठातील गावे प्रभावित झाली आहेत. देर्डा (सावंगी) पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
रात्रीला देर्डा, सावंगी, धानोली, आष्टा, नांद्रा, तरोडा आदि गावात रात्रीपासून पाऊस सुरू झाला तो पहाटे पर्यंत सुरूच होता. या पावसामुळे नदी नाले, तुडूंब भरले. बहुसंख्य शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
देर्डा व सावंगी या दोन्ही गावाच्या मध्यातून बोर व धाम नदीचा संगम होवून वाहत असतो. पुढे या नद्या आष्टा व नांद्रा या दोन गावाच्या मधून वाहतात. दोन्ही ठिकाणी ढोल्यांचे रपट्या प्रमाणे पूल आहे. या पुलांची उंची कमी आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आज दुपारपर्यंत पुलावर कमरे पर्यंत पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. या गावातील नागरिकांना घर गाठण्याकरिता दिंदोडा व शिवनगर अशा फेऱ्यांनी जावे लागले. त्याचा नाहक त्रास या गावकऱ्यांना सोसावा लागला आहे. अशीच काहिशी परिस्थिती आष्टा, नांद्रा या गावकऱ्यांची झाली आहे.
आज दिवसभर उन्ह सावलीचा खेळ सुरू असून उन्ह चिडावणारी असल्याने सायंकाळी पाऊस कोसळणार असे संकेत मिळत असल्याचा अंदाज काही गावकऱ्यांनी व्यक्त केला. यातच दुपारी ३ वाजतापासूनच हमदापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी नदी काठची गावे मात्र प्रभावित होवून वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.
पुलाची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष
सावंगी व देर्डा या गावांना जोडणारा पूल कमी उंचीचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे या भागातील नागरिकांनी या पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला अनेकवार निवेदने दिली; मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका या भागातील नागरिकांना बसत असून प्रत्येक पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढविण्याच्या असलेल्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.