भदाडीच्या पुरात पीक गेलं वाहून; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, वीज तार तोंडात घेऊन जीवन संपवलं

By महेश सायखेडे | Published: August 20, 2022 12:57 PM2022-08-20T12:57:47+5:302022-08-20T13:03:16+5:30

अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

Heavy rains cause heavy agricultural losses; The farmer committed suicide in Wardha | भदाडीच्या पुरात पीक गेलं वाहून; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, वीज तार तोंडात घेऊन जीवन संपवलं

भदाडीच्या पुरात पीक गेलं वाहून; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, वीज तार तोंडात घेऊन जीवन संपवलं

Next

वर्धा - यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. हवालदील शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा असल्याच्या पार्श्वभूमीवर भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. गणेश श्रावण माडेकर (३६) रा. पढेगाव असे मृत्यूस कवटाळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पढेगाव या गावातील रहिवासी शेतकरी गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी यंदाच्या वर्षी तूर, सोयाबीन व कपाशी पिकाची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. भदाडीच्या पुरामुळे गणेश माडेकर याच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्यात दाखल होत वर्धा जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत आपल्यालाही मिळेल अशी आशा या शेतकऱ्याला होती. पण राजकीय पुढाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे लक्षात आल्याने हवालदील शेतकरी गणेश यांचे मनोधैर्य खचले. अशातच गणेश यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

'या' भागातील शेत पिकांना बसलाय भदाडीच्या पुराचा फटका

भदाडी नदीच्या पुराचा वर्धा तालुक्यातील पढेगाव,सेलसुरा, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव आदी भागातील शेत पिकांना चांगलाच फटका बसला आहे. या भागातील नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.

पढेगावावर पसरली शोककळा

वीज तार तोंडात घेऊन जीवन यात्रा संपविणाऱ्या शेतकरी गणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडिल असा आप्त परिवार आहे. गणेशच्या आत्महत्येमुळे माडेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पढेगावावर शोककळाच पसरली आहे.
 

Web Title: Heavy rains cause heavy agricultural losses; The farmer committed suicide in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.