मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:16+5:30

सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक फटका विद्यार्थ्यांना बसला.

Heavy rains hit rural areas | मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका

मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका

Next
ठळक मुद्देआष्टी-वरूड मार्गावरील वाहतूक ठप्प : समुद्रपूर तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मंगळवारी रात्री पासून थांबून-थांबून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बुधवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगलाच फटका सहन करावा लागला. सततच्या पावसामुळे आष्टी-वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून समुद्रपूर तालुक्यातील रासा, घोणसा, पिपरी या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.
सदर गावांना जोडणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. तर मंगरुळ गावात पुराचे पाणी शिरले. शिवाय सेलू शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची कोंडी झाल्याने मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप आले होते. काही घरांमध्ये पावसाचे पाणीही शिरले. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली. वर्धा शहरातही सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दाणापूर येथील गुराखी गुणवंत घसाड (५८) हा धाम नदीतून मार्ग काढत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. वृत्तलिहिस्तोवर शोध सुरू होता.

जनजीवन विस्कळीत; शेतशिवार जलमय
समुद्रपूर - वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खोलगट भागातील शेतशिवार जलमय झाले आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छोटे व मोठे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात सध्या पावसाची धुवाधार बॅटींगच सुरू आहे. तीन दिवसांपासून पाऊस आपला जोर कमी-अधिक प्रमाणात कायम ठेवत असल्याने नदी व नाले दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील मंगरुळ गावात पुराचे पाणी शिरले. शिवाय पिपरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने रासा, घोणसा, पिपरी या गावांचा इतर गांवाशी संपर्क तुटला आहे. तर हिंगणघाट-उमरेड मार्गावरील खापरी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे. तर वडगावातही पुराचे पाणी शिरले. सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक फटका विद्यार्थ्यांना बसला. तालुक्यातील नाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आष्टी-वरुड महामार्गावरील वाहतूक ठप्प
आष्टी (शहीद) - सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय आष्टी-वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आष्टी-साहूर-वरुड राष्ट्रीय महामार्गावरील जाम नदी वरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून तयार केलेला डायव्हर्शन यंदा तिसऱ्यांदा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून आष्टीला येणाऱ्यांना बोरगाव-टूमणी- झाडगाव-पंचाळा-पोरगव्हाण प्रवास करावा लागला. गावामधील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाऊस सुरू असताना विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला. अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून तो मंगळवारपर्यंत ५२.४५ टक्के भरला आहे. त्याची पाणी पातळी सध्या ६२ टक्क्याने भरल्याचे सांगण्यात येते. आष्टी मार्गे लहान-आर्वी-अंतोरा-बेलोराकडे जाणारी वाहतूक पुलावरील पाण्यामुळे खोळंली आहे. तर तळेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून कुठलेही वाहन नेता येत नाही. तेथे सध्या चिखल तयार झाला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी, तूर पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अंतोरा, लहान आर्वी, बेलोरा, तळेगाव, भारसवाडा, साहुर, माणिकवाडा, तारासावंगा, थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी या गावांमधील अनेक घरांची पडझड झाली.

Web Title: Heavy rains hit rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.