बंदी झुगारून व्हीआयपी मार्गावर जड वाहतूक
By admin | Published: April 12, 2017 12:29 AM2017-04-12T00:29:13+5:302017-04-12T00:29:13+5:30
शहरातील व्हीआयपी मार्गावरून जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी दोन ठिकाणी लोखंडी खांब लावण्यात आले होते;
बांधकाम विभागाची मूकसंमती : मोठ्या अपघाताची नांदी
वर्धा : शहरातील व्हीआयपी मार्गावरून जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी दोन ठिकाणी लोखंडी खांब लावण्यात आले होते; पण काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत विश्रामगृह शेजारचा खांब तुटला. आता या मार्गाने सर्रास जड वाहतूक होत असून बांधकाम विभागाने यांना मूकसंमती तर दिली नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बराच कालावधी लोटूनही तो खांब पूर्ववत केला नाही. शहरातील सिव्हील लाईन भागातील विश्रामगृह ते नालवाडी चौक या मार्गाला ‘व्हीआयपी’ रोड म्हणून ओळखले जाते. सदर मार्गावर तत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला होता. जड वाहनांची या मार्गाने ये-जा होऊ नये म्हणून नालवाडी चौक तसेच सिव्हील लाईन भागातील विश्रामगृह परिसरात मोठ्या लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेकदा वाहनांच्या धडकेत त्या तुटल्या व बांधकाम विभागाने दुरूस्तही केल्या; पण सध्या नालवाडी चौकातील लोखंडी कमान कायम असली तरी काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत विश्रामगृह परिसरातील लोखंडी कमान तुटली ओह. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगण्यात येते. लोखंडी खांब तुटल्यानंतर ते दुरूस्त करणे सोडून सदर विभागाने ते रस्त्याच्या कडेला ठेवले आहेत. यामुळे या मार्गाने पुन्हा जड वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. अवजड वाहनांचे चालक या मार्गाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव नेत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे.(शहर प्रतिनिधी)