१.९० मीटरने वाढणार धाम प्रकल्पाची उंची
By admin | Published: September 24, 2015 02:32 AM2015-09-24T02:32:22+5:302015-09-24T02:32:22+5:30
प्रकल्पांची उंची वाढविल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वृद्धी होऊ शकते. ही बाब ध्यानात घेत १९९९ मध्ये महाकाळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
१६ वर्षांपासूनचा प्रस्ताव : १२८.८५ हे.आर शेत, तर ३६.२३ हे.आर वन जमिनीचे होणार अधिग्रहण
प्रशांत हेलोंडे वर्धा
प्रकल्पांची उंची वाढविल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वृद्धी होऊ शकते. ही बाब ध्यानात घेत १९९९ मध्ये महाकाळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला तब्बल १६ वर्षांनी मूर्त रूप प्राप्त होत आहे. प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून तत्वत: मान्यता मिळाली आहे. धाम प्रकल्पाची उंची वाढविल्यास जलसाठ्यात १९.५४ दलघमीने वृद्धी होणार आहे. परिणामी, पिण्याकरिता तसेच उद्योग व शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे.
आर्वी तालुक्यात येणाऱ्या धाम नदीवरील महाकाळी धरणाची उंची वाढविणे प्रस्तावित होते. प्रकल्पाची उंची वाढविण्यास सिंचन, पिण्याकरिता तसेच उद्योगांना पाणी मिळणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेत १९९९ मध्ये धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाच्यावतीने तत्वत: मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याकरिता कुणाचे पुनर्वसन करण्याची गरज नसली तरी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. धाम प्रकल्पाची उंची १.९० मिटर म्हणजे तब्बल ६.२३ फुट उंची वाढविण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील १२८.८५ हेक्टर आर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. शिवाय वन विभागाची ३६.२३ हेक्टर आर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. यातील वन विभागाच्या जमिनीसाठी ५ कोटी ३९ लाख रुपये वन विभागाकडे ३१ एप्रिल २०१४ रोजी जमा करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहणासाठी प्रस्ताव अंतिम मंजुरीकरिता वन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वन विभागाकडूनही या प्रस्तावाला मान्यताच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे; पण अद्याप पाटबंधारे विभागाकडून ‘कॅचमेंट एरीया’ प्रस्ताव प्राप्त न झाल्याने प्रक्रिया रखडली आहे.
महाकाळी धरणाच्या सांडव्याची उंची १.९० मिटरने वाढविली जाणार आहे. यासाठी २२.६४ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; पण सध्या ही किंमत वाढली असून आता कामाची किंमत ६१.२९ कोटी रुपये झाली आहे. या निधीलाही तत्वत: मंजुरी मिळाली असून अद्याप प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून सदर प्रस्ताव नाशिकला मुख्य कार्यालयाकडे (सीडीओ) तपासणीसाठी पाठविल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अविनाश डफरे यांनी दिली. महाकाळी प्रकल्पाची उंची वाढविण्याकरिता सदर प्रकल्प पाटबंधारे विभाग वर्धा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. याची प्रक्रिया सुरू असून येत्या एक-दोन दिवसांत प्रकल्प हस्तांतरित होणार असल्याचेही सांगण्यात आले. १९९९ मध्ये पाठविलेल्या उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला तब्बल १६ वर्षांनी मूर्त रूप प्राप्त होणार आहे. प्रकल्पाची उंची वाढल्यास वर्धा व लगतच्या अकरा गावांतील पिण्याच्या प्राण्याचाही प्रश्न सुटेल. शिवाय सिंचन क्षमतेतही वाढ होईल. यामुळे धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे.
जलसाठ्यात होणार १९.५४ दलघमी वाढ
महाकाळी प्रकल्पाची उंची १.९० मीटर वाढविण्यात येणार आहे. १९९९ मध्ये पाठविलेल्या या प्रस्तावाला आता २०१५ मध्ये मूर्त रूप प्राप्त होत आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या धाम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ... असून त्यात १९.५४ दलघमी जलसाठा वाढणार आहे. यामुळे पिण्यासह सिंचन व उद्योगांनाही पाणी उपलब्ध होणार आहे.
महाकाळी प्रकल्पाची उंची वाढविण्यासह खोलीकरणाचा प्रस्ताव पाठविणेही गरजेचे आहे. धाम प्रकल्पात सध्या गाळाचे ढीग आहेत. खोलीकरण करण्यात आल्यास गाळ शेतीच्या उपयोगी पडणार असून जलसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते.
२००० हेक्टर सिंचन क्षमता वाढणार
महाकाळी प्रकल्पाची उंची वाढविल्यानंतर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. धाम प्रकल्पातील वाढीव जलसाठ्यातून ७.५४ दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे सिंचन होऊ शकणार आहे.
वाढीव जलसाठ्याचे वितरण
प्रकल्पाची उंची वाढविल्यानंतर संचित होणाऱ्या अतिरिक्त जलसाठ्याचे वितरणही निर्धारित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला १०.४७ दलघमी, हिंदी विद्यापीठाला ०.२२ दलघमी, महात्मा साखर कारखाना जामणी १.३० दलघमी तर ७.५४ दलघमी जलसाठा सिंचनासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे.