प्रियकराच्या मदतीने पोलीस पत्नीने केली पतीला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 04:27 PM2021-12-16T16:27:02+5:302021-12-16T16:43:28+5:30
पोलीस पत्नीने तिच्याच पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस प्रियकराची मदत घेत पतीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना केळझर येथे घडली.
वर्धा : पोलीस पत्नीने तिच्याच पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस प्रियकराची मदत घेत पतीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना केळझर येथे घडली. पतीने याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली, पण पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून काढता पाय घेतला.
केळझर येथील अयफाज जमीर शेख हा ट्रॅव्हल्सवर वाहक म्हणून काम करतो. त्याचा प्रेमविवाह २०१४ मध्ये पूजा गिरडकर रा. वर्धा हिच्याशी झाला. अयफाजची पत्नी पूजा ही कारंजा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरीवर आहे. मात्र, तिचे प्रेमसंबंध त्याच ठाण्यातील नाईक पोलीस शिपाई मनोज सूर्यवंशी याच्याशी जुळले. अयफाजने तिला अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूजा नेहमी वाद करीत होती, असे अयफाजने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बुधवारी पत्नी पूजा ही अयफाजच्या घरी आली आणि मुलाचे कपडे बॅगमध्ये भरत होती. काही वेळात मनोज सूर्यवंशी हा घरात आला. अयफाजने त्यास हटकले असता पूजा आणि मनोज या दोघांनी अयफाजला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पूजाने पती अयफाजच्या कानशिलात लगावली. पूजा आणि मनोज हे दोघेही मद्यधुंद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार अयफाजने सेलू पोलिसात दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली हे विशेष.