आमदारांच्या सहकार्याने सेलू शहराची पालटली दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:25+5:30
आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विकासापासून कोसोदूर असलेल्या सेलू शहराच्या विकासाकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून शहराची दशा आणि दिशाही बदलली आहे. आताही शहराची विकासाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे, असे मत सेलूच्या नगराध्यक्ष शारदा माहुरे यांनी व्यक्त केले.
सेलू शहरातील विविध विकासकामांची पायाभरणी बुधवारी खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष शारदा माहुरे, भाजपाचे पदाधिकारी जयंत कावळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, सेलू नगरपंचायतचे गटनेते शैलेंद्र दफ्तरी, नगरपंचायत उपाध्यक्ष अनिल काटोले, माजी सभापती शैला शब्बीर अली, भाजप सेलू शहरप्रमुख शब्बीर अली, नगरसेवक चुडामण हांडे, सन्नी खोडे, वैशाली पाटील, प्रेमा जगताप, कल्पना कळसाईत, हिंमतशहा अली, राजू जयस्वाल यांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष शारदा माहुरे म्हणाल्या, आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. यातून शहरातील विविध रस्ते, नाल्या, स्मशानभूमी विकास, मटण व मच्छी मार्केट आदीच्या कामांना गती मिळाली आहे. यापूर्वीदेखील कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असून त्या अंतर्गत विविध विकासकामे झाली आहेत. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात सेलू शहरासोबतच तालुक्याचा समतोल विकास होत आहे. शहरातील बसस्थानकाचे काम देखील प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांच्या या विकासात्मक धडपडीला भक्कमपणे साथ देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्यात. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.