देशातील प्रत्येक दिव्यांगाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:51 PM2017-11-19T23:51:54+5:302017-11-19T23:52:27+5:30
आॅनलाईन लोकमत
वर्धा : दिव्यांगाची सेवा हीच ईश्वर सेवा समजून देशातील प्रत्येक विकलांगाला मदत करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. शासन दिव्यागांना असलेल्या व्यंगानुरुप अपंग साहित्य वाटप, नौकरी मध्ये आरक्षण, व्यवसायासाठी अनुदान, आरोग्यासाठी तसेच वृद्धांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकालांगांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
आज सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित पोलिस कवायत मैदान येथे सामाजिक अधिकारिता शिबिर व निशुल्क सहाय्यक उपकरण वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, देवळी नगर परिषदच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, वर्धा पालिकेचे उपाध्यक्ष प्रदिपसिह ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जि.प. सदस्य पंकज सायंकार, एलिम्कोचे महाव्यवस्थापक अशोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना तडस म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम या कंपनीच्यावतीने जिल्ह्यात समुद्रपूर, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू व वर्धा येथे दिव्यागांची नोंदणी व मोजमाप शिबिराचे आयोजन होते. या शिबिरात ५ हजार दिव्यांगाची नोंदणी करण्यात आली. यातील पात्र अशा २ हजार १२१ दिव्यांगाना अपंग साहित्याचे आज वितरण करण्यात आले. यानंतर काही नोंदी न झालेल्या दिव्यांगासाठी लवकरच हिंगणघाट येथे शिबिराचे आयोजन करून अपंग साहित्य वितरीत करण्यात येणार असल्याचे तडस म्हणाले. जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषदेने व जिल्हा परिषदेने प्राप्त होणाºया निधीपैकी ३ टक्के निधी अपंगाच्या कल्याणासाठी वापरावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्यात.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील ४ हजार ५०० दिव्यांगाना विमा, ४ हजार २०० दिव्यांगाना कार्ड, २ हजार १२१ दिव्यांगाना अपंग साहित्य वाटप केल्याचे सांगितले. तसेच उर्वरित दिव्यांगाना पुढील शिबिरात वितरीत करण्यात येणार आहे. आशा व अंगणवाडी सेविकांनी केलेल्या जनजागृतीबद्दल जिल्हाधिकाºयांनी याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर, अतुल तराळे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते समीर राऊत व भास्कर राऊत याला स्मार्ट फोन, शोभा पवार व सुनिता पूणेकर ट्रायसिकल, मयूरी सेलवटकर-कॅलीपर व्हीलचेअर, मारुती धोटे यांना कर्णयंत्र, निखील-बेल किट, शिवानी व प्रमोद यांना एम.एस.आय. ई.डी. किट, सुमन यांना स्मार्ट किटचे प्रतिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार डॉ. मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची उपस्थिती होती.
१ कोटी ३९ रुपयाचे साहित्य वितरित
कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. थावरसिह गेहलोत हे दुरध्वनी द्वारे संदेश देताना म्हणाले, दिव्यांग सशक्तीकरण योजने अंतर्गत देशातील दिव्यागांना १ करोड ३९ रुपयाचे अपंग साहित्य वितरित करण्यात आले असून ८ लाखापेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. दिव्यांगाना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. तसेच नोकरी मध्ये ४ टक्के आरक्षणाची सुविधा देण्यात येत असल्याचे सांगितले.