शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:26 AM2018-08-25T00:26:56+5:302018-08-25T00:28:01+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या केली. तर अंतरगाव या गावातील शेतकरी किसना श्रीसागर यांचा शेतातील विहीरीत पडून अपघाती मृत्यु झाला. या तिन्ही घटनेची माहिती समुद्रपूर तालुक्याच्या नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी दिनेश जाधव यांना मिळताच त्यांनी ही माहिती नाम फाउंडेशनचे विदर्भ व खांदेश प्रमुख हरीश इथापे यांना दिली असता लगेच त्यांनी चौकशी करुन नामच्यावतीने प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या तात्काळ मदतीचे धनादेश आधार संघटनेच्यावतीने नारायणपूर (कोरा) येथील विलास चौके यांची आई शांता चौके तसेच रासा येथील आत्माराम तोडासे यांची पत्नी लिला तोडासे व अंतरगाव येथील किसना श्रीसागर यांची पत्नी कासा श्रीसागर या तिन्ही कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली.धनादेश देतांना आधार संघटनेचे संघटक दिनेश जाधव, सिंदी शहर प्रमुख शाहरुख पठाण, उपाध्यक्ष विजय राऊत, सचिव भुषण उगेमुगे, मिडिया प्रमुख आदिनाथ काटोले, समुद्रपूर उपाध्यक्ष शुभम महंतारे, महेश अवचट, मंगेश मिश्किन, आनंद मुडे, शुभम झाडे, प्रवीण भारसाखरे व पंकज नागमोते तसेच आधारचे पदाधिकारी उपस्थित होते.योग्य पाठपुरावा करुन तात्काळ व घरपोच मदत मिळवून दिल्याबद्दल मदतप्राप्त कुटुंबियांनी आभार मानले.