औषधी वनस्पतींनी सजली पिलापूर रोपवाटीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:54 PM2019-05-27T21:54:15+5:302019-05-27T21:54:36+5:30
वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या संत तुकारामांच्या अभंगाचा सार्थ बोध घेत आष्टी वनविभागाने पिलापूर येथे भर उन्हाळ्यात प्रचंड मेहनतीच्या व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रोपवाटीका तयार केली आहे. यामध्ये १७० प्रकारच्या औषधी वनस्पतींसह साडेचार लाख रोपटी तयार करण्यात आली आहे. हे तपत्या उन्हातील हिरवेगार नंदनवन अनेकांना भुरळच घालत आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या संत तुकारामांच्या अभंगाचा सार्थ बोध घेत आष्टी वनविभागाने पिलापूर येथे भर उन्हाळ्यात प्रचंड मेहनतीच्या व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रोपवाटीका तयार केली आहे. यामध्ये १७० प्रकारच्या औषधी वनस्पतींसह साडेचार लाख रोपटी तयार करण्यात आली आहे. हे तपत्या उन्हातील हिरवेगार नंदनवन अनेकांना भुरळच घालत आहे.
पिलापूर येथील सहा हेक्टर जमीन खडकाळ व लाल मुरूमाची. वनविभागाने या जमिनीवर रोपवाटीका तयार करण्याचा निर्धार केला. याच परिसरात वननाका उभारण्यात आला. त्यांच्या बाजूला ४ इंच व्यासाचा बोर करून रोपवाटीकापर्यंत जलवाहिनी टाकून तेथे पाणी नेण्यात आले. येथे साठवणीसाठी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा एक मोठा खड्डा खोदून त्यात प्लॉस्टीकची ताडपत्री टाकण्यात आली. यानंतर म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका यामध्ये साग प्रजातीची एकूण एक लाख रोपांची १५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दुसरी ६५ हजार मिश्र प्रजातीची रोपटी तयार करण्यासाठी ३४ लाखांची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर तिसरी १ लाख २५ हजार रोपांची विविध प्रजातीची रोपटे तयार करण्यासाठी ५० लाख तर चौथी मिश्र प्रजातींची १ लाख ९ हजार रोप तयार करण्यासाठी ५७ लक्ष रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये पिलापूर, येनाडा, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर गावातील मजूरांना कामासाठी बाराही महिने रोजगार मिळाला. मोठ्या प्रजातींच्या रोपट्यांमध्ये साग, निंब, उंबर, पिंपळ, करंज, बिहाडा, आवळा, चिंच, सिसू, बांबु, बेल, सिसम, आहा, तेदू, सिताफळ याचा समावेश आहे. प्रत्येक रोपांसाठी बेड तयार करून लहान व मोठ्या पॉलीथीन तयार करून त्यामध्ये रोपटी तयार करण्यात आली. एका वेगळ्या ठिकाणी औषधी वनस्पतींची स्वतंत्र रोपटी तयार करण्यात आली. त्याला नावे देवून त्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले. या रोपट्यांना तपत्या उन्हाच्या जास्तीत जास्त झळा बसू नये अशी व्यवस्थाही करण्यात आली. शिवाय उपलब्ध पाण्याचे नियोजन करून झाडांना देत देण्यात आले. इतकेच नव्हे तर रोपट्यांची वेळोवेळी निगा घेतल्याने येथे हिरवेगार नंदनवनच तयार झाले आहे.
अनेकांनी दिली भेट
पिलापूर रोपवाटीका तयार करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक, इंद्रपाल भगत यांचे विशेष सहकार्य राहिले आहे. या रोपवाटीकेची पाहणी उपवनसरंक्षक सुनील शर्मा, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनीही वेळोवेळी केली आहे. शिवाय त्यांनी येथील कामाबाबत समाधान व्यक्त केले.
पिलापूर रोपवाटीका वर्धा वनविभागात पहिल्या क्रमांकावर आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अधिकाऱ्यांनी सातत्याने अशा प्रकारचे काम केल्यास शासनाला फायदा होईल.
- सुनील शर्मा, उपवनसरंक्षक, वनविभाग, वर्धा.