सोनेगावच्या यशोदानदीचे पात्र पोखरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:32 AM2019-02-25T00:32:28+5:302019-02-25T00:32:48+5:30
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा व भदाडी नदीचा संगम आहे. या संगमाच्या पात्रात वायगाव व वर्धा परिसरातील गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्री दहा वाजतानंतर अवैधरीत्या वाळूउपसा केला जात असल्याने नदी पात्र पूर्णत: पोखरले जात आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा व भदाडी नदीचा संगम आहे. या संगमाच्या पात्रात वायगाव व वर्धा परिसरातील गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. रात्री दहा वाजतानंतर अवैधरीत्या वाळूउपसा केला जात असल्याने नदी पात्र पूर्णत: पोखरले जात आहे. तसेच या जडवाहतुकीमुळे सोनेगाव (बाई) ते सरुळपर्यंतच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव झाला नसल्याने वाळूमाफियांनी आपला मोर्चा गावखेड्याकडील नदीपात्राकडे वळविला आहे. सानेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रातही मागील कित्येक महिन्यांपासून बिनबोभाटपणे वाळूउपसा सुरू आहे. कारवाईच्या धाकाने रात्री दहा वाजतापासून पहाटे दिवस उजाडेपर्यंत वाहनांची रेलचेल असते. रेतीची मागणी वाढली असल्याने विना रॉयल्टीची वाळू शहरात १५ ते २० हजार रुपये प्रति टिप्पर किंवा ट्रक अशी चढ्या दराने विकली जात आहे.
एकाच रात्रीतून आठ ते दहा टिप्पर वाळूचोरी साधली जात असल्याने दिवसाकाठी लाखो रुपयांची कमाई वाळूमाफिया करीत आहेत. यशोदा नदीपात्रात धुडगूस घालणारे वाळूमाफिया वायगाव व वर्धा परिसरातील असून राजकीय पुढाऱ्यांच्या मागे-मागे फिरणारे अथवा दुपट्टाधारी नेतेमंडळी आहे.
काहींनी टिप्पर, ट्रक तर काहींनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूचोरी चालविली आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले असून भविष्यात हे नदीपात्र धोकादायक ठरणार आहे. या नदीपात्रातून गावातील शेतकºयांसह जनावरांचे अवागमन असते. त्यामुळे गावकºयांनी वेळीच धोका लक्षात घेऊन येथील अवैध वाळूउपस्याला तत्काळ कडाडून विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोबाईलच्या टॉर्चवरून मिळतोय सिग्नल
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूचोरी करण्याकरिता वाळूमाफियांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहे. नदीपात्रातून रेतीची अवैधरीत्या उचल करीत असताना आवाज येऊ नये तसेच इतरांना इशारा करण्यासाठी मोबाईलच्या टॉर्चचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नदीपात्रात एक ावेळी एकच वाहन भरले जाते. इतर वाहने पात्रापासून काही अंतरावर वेगवेगळ्या दिशेने उभी ठेवली जातात. पात्रात वाहन भरत असताना वाहनासमोर रस्त्याच्या दिशेने मोबाईलचा टॉर्च वाळूमध्ये रुतवून ठेवला जातो. तर इतर वाहनाचे चालकही मोबाईलचा टॉर्च हातात धरून एकामेकांच्या टॉर्चकडे लक्ष देऊन असतात. कुणाचेही वाहन पात्राच्या दिशेने गेले तर लगेच नदीपात्रातील मोबाईलचा टॉर्च आॅफ केला जातो. तो आॅफ होताच इतर वाहनांचे चालक मालकाला किंवा त्यांना बॅकअप देणाºया वाहनांना कॉल करून माहिती देतात. अशाप्रकारे मोबाईल टॉर्चच्या सिग्नलने त्यांचा गोरखधंदा सुरू आहे.
‘बॅकअप व्हॅन असते पाळतीवर
सोनेगाव (बाई) ते टाकळी (चनाजी) मार्गावर एक वळण आहे. या वळणापासून दीड किलोमीटरपर्यंतचा पांदण रस्ता तयार केला असून तो थेट यशोदा नदीपात्रात जातो. या पांदण रस्त्याने वाळूची वाहतूक करणारे वाहने आत गेली की या वाहनांना कारच्या माध्यमातून ‘बॅकअप’ दिला जातो. रात्रभर ही कार सोनेगाव (बाई) ते सरुळ या गावापर्यंत गस्त घालतात. अधिकारी किंवा कुणाची वाहने नदीपात्राच्या दिशेने गेली की, लगेच या बॅकअप वाहनाला माहिती दिली जाते. ही वाहन तात्काळ घाटात पोहोचतात. इतकी जबरदस्त फिल्डींग या वाळूमाफियांची आहे. त्यामुळे अधिकाºयांनी कारवाई करीत वाळूची वाहतूक करणाºया वाहनांसोबतच बॅकअप देणारी वाहनेही जप्त करण्याची गरज आहे.
दीड कि.मी.चा तयार केला पांदण रस्ता
वाळूमाफियांनी नदीपात्रात शिरण्याकरिता शेतशिवारातून जवळपास दीड किलोमीटरचा पांदण रस्ता तयार केला आहे. पांदण रस्ता तयार करताना काही झाडेही तोडली असून ठिकठिकाणी मुरुम टाकून नदीपात्रातील विविध भागात पोहोचण्यासाठी रस्ते तयार केले आहे. काही भागात टिप्पर, ट्रकसारखी मोठी वाहने, तर काही भागात टॅÑक्टरव्दारे वाळू वाहतूक सुरू आहे. सोबतच लगतच्या शेतातही वाहने उभी करण्यासाठी जागा तयार केली असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नदीपात्राकडे जाणाºया मुख्य मार्गाकडे वाळूमाफियांनी दुर्लक्ष करीत पांदण रस्त्याचा आधार घेत चोरमार्गाने उपद्रव चालविला आहे. त्यामुळे अधिकाºयांनाही कारवाईकरिता अडचण निर्माण होत आहे. पांदण रस्ता अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने वाळूमाफियांचे उखळ पांढरे होत आहे.
गावातून मोठ्या प्रमाणात वाळूचोरी होत असल्याची माहिती ग्रामसेवक, तलाठी व मंडळ अधिकाºयांना असतानाही कारवाई होत नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा पथकाने कारवाई करीत चार वाहने पकडली होती. जिल्ह्यातील पथक कारवाई करू शकते, पण स्थानिक पथकाकडून कानाडोळा होत असल्याने यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे.