अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 09:17 PM2023-04-25T21:17:18+5:302023-04-25T21:17:50+5:30
Wardha News शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे.
वर्धा : शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे. संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे तीन हप्ते जमा झाले; पण त्यानंतर शासकीय मदत का मिळाली नाही याची विचारणा करण्यासाठी शेतकरी संबंधिताकडे गेला असता तुमचा तर मृत्यू झाला. त्यामुळेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आले. अहो! मी अजूनही जिवंत आहे, हे पटवून देण्यासाठी आता या शेतकऱ्याला शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्याला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी हवालदिल शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांनी केली आहे.
गहेरवार यांच्याकडे वडिलोपार्जित १.११ हे.आर. शेतजमीन
दारोडा येथील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांची शेतजमीन दारोडा शिवारात असून ते याच वडिलोपार्जित शेतजमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ९ मार्च २०२० ला पीएम किसान योजनेचा पहिला, १५ एप्रिल २०२० ला दुसरा तर ९ ऑगस्ट २०२० ला तिसरा हप्ता मिळाला; पण मयत दर्शवित त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित संबंधिताला विचारणा केल्यावर आपल्याला जिवंतपणीच मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.
तहसीलदारांनीही उडविली थट्टा
संबंधित गंभीर बाब शेतकरी गहरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंगणघाट येथील तहसील कार्यालय गाठून त्याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली; पण तहसीलदारांनीही उडवाउडवीचे उत्तर दिल्याने हवालदील शेतकरी रामसिंग गहरवार यांनी आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाची पायरी चढली. आमदारांना आपबीती सांगितली. तेव्हा तू काळजी करू नकोस, तू तहसीलदाराकडे पुन्हा जा, तुझे काम होईल, असे सांगितल्याने शेतकरी पुन्हा तहसीलदारांकडे आला. तेव्हा, तू आमदार साहेबांकडून आला. तेव्हा तू जिवंत होताच, काळजी करू नको, असे म्हणत तहसीलदारांनी हवालदील शेतकऱ्याची थट्टाच केली. तालुका कचेरी ते आमदार आणि पुन्हा तालुका कचेरी अशी पायपीट करूनही समस्या निकाली निघाली नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.