कोविडपेक्षा उच्च रक्तदाब अन् मधुमेह ठरतो भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:13+5:30
मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल २६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी या कोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोविडपेक्षा उच्च रक्तदाब आणि मधुमेहच भारी ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या प्रार्थमिक चौकशीत पुढे आले आहे.
मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
या बैठकीत विविध बाबींवर चर्चा करीत काही निष्कर्ष काढण्यात आले. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना पूर्वी काही आजार होते काय याचा शोध घेण्यात आला. या प्रार्थमिक चौकशीदरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी बहूतांश व्यक्तींना उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार असल्याचे पुढे आले आहे. लवकरच डेथ ऑडिटचा सखोल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
राज्यातील पहिला प्रयोग
कोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग वर्धा जिल्ह्यात केला जात आहे. तो राज्यासाठी मार्गदर्शक तसेच राज्यातील पहिला असल्याचे सांगण्यात येते. लवकरच या डेथ ऑडिटचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे.