वर्ध्यात चार तासांमध्ये व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची जबरजस्त लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 03:04 PM2020-03-29T15:04:19+5:302020-03-29T15:04:40+5:30
किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: देशासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने देशासह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी संचारबंदीमध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याकाळात किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यात किराणा, भाजीपाला, मेडिकल व दवाखाने यासारख्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सामान्य जनतेला सोयीचे व्हावे म्हणून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात वस्तूंचा काळाबाजार करू नये, दुकानासमोर मर्यादित अंतरावर ग्राहकांना उभे करून माल द्यावा. दुकानासमोर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची गर्दी होऊ नये. तसेच ग्राहकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्यावर लक्ष ठेवणे. दुकानासमोर ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था करणे आदी जबाबदाºया दुकानदारांना देण्यात आल्या असतांना शहरात संचारबंदीतील सुटी दरम्यान भाजीपाला व अन्य दुकानासमोर गर्दी होत आहे.
दुचाकीसुद्धा थेट दुकानासमोर लावल्या जाते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहकाची गर्दी होत आहे. त्यातही साखरेचा कृत्रिम तुटवडा केल्या जात असल्याची ओरड होत आहे. तर काही किराणा दुकानदार खाण्याचे तेलसुद्धा १०० ते १५० रुपये प्रति डब्बा चढ्या भावाने विकल्या जात आहे. पशुखाद्य ढेप सुद्धा चढयाभावाने विकल्या जात आहे. याकडे संबंधित विभागाने चौकशी करून दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संचारबंदीचा सुटीचा फायदा दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात उचलत असून याकाळात इतर होणाºया वाहतुकीपेक्षा दुचाकी वाहनांची रस्त्यावरील चहलपहल मोठ्या प्रमाणात दिसून येते.