महामार्गाचे काम राजकारणात नाही; दफ्तरदिरंगाई, कंत्राटदारांमुळे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 05:00 AM2021-08-22T05:00:00+5:302021-08-22T05:00:02+5:30
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे. या आठ राष्ट्रीय महामार्गांपैकी वर्धा ते यवतमाळ, बुट्टीबोरी ते वर्धा व वर्धा ते हिंगणघाट या तीन महामार्गाचे काम पूर्ण झाले असून तळेगाव (श्याम पंत) ते गोणापूर चौकी, वर्धा ते आर्वी आणि वडनेर ते देवधरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. या महामार्गाच्या कामातील कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या मार्गांवरून आवागमन करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात कामाला गती मिळावी याकरिता आंदोलने करण्यात आली, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दबंगशाही झाली नाही, असेच चित्र आजपर्यंत राहिले आहे.
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे. या आठ राष्ट्रीय महामार्गांपैकी वर्धा ते यवतमाळ, बुट्टीबोरी ते वर्धा व वर्धा ते हिंगणघाट या तीन महामार्गाचे काम पूर्ण झाले असून तळेगाव (श्याम पंत) ते गोणापूर चौकी, वर्धा ते आर्वी आणि वडनेर ते देवधरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आर्वी ते तळेगाव आणि सेलडोह-सिंदी(रेल्वे)-सेवाग्राम-पवनार या मार्गाच्या कामाची फेरनिविदा करण्यात आल्याने आता कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोन मार्गांचे काम कधी पूर्णत्वास जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जी कामे अंतिम टप्प्यात आहे त्या कामांना कोरोनामुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे कंत्राटदाराला नियमानुसार वाढीव मुदत देण्यात आली असून, लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राजकारणी काय म्हणतात...
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असून, कुठेही कामामध्ये आठकाठी टाकून राजकारण केल्याचा प्रकार घडला नाही. जर कामात सदोषता असेल, कामामध्ये दिरंगाई होत असेल किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल तर गावकऱ्यांच्या पुढाकाराने आंदोलन करून प्रशासनास अवगत करण्यात आले. पण, काम बंद पाडण्याचा प्रकार कुठेही घडला नाही.
मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात काही अडचणी आल्या किंवा गावकऱ्यांना त्रास झाला तर त्यांनी लगेच संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिले. परंतु जिल्ह्यात कुठेही काम अडविण्यात आले, काम बंद पाडण्यात आले, अशी एकही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाहीत आणि तसा प्रकारही कुठे निदर्शनास आला नाही.
डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप
आर्वी-तळेगाव (श्या.)
- आर्वी ते तळेगाव (श्याम.पंत) या १३.७० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाकरिता शासनाकडून ९९.४६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या मार्गाचे काम सुरू झाले परंतु, कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष यामुळे काम रखडले. अखेर या कामाची फेरनिविदा करावी लागली असून, आता नव्याने काम सुरू झाल्याने कामाची गती संथच असल्याचे दिसून येत आहे.
सेलडोह-पवनार
- सेलडोह-सिंदी (रेल्वे)-सेवाग्राम-पवनार या ४८.६२ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाकरिता ४०४.३३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु याही कामामध्ये पहिल्या कंत्राटदाराने हयगय केली. यामुळे नागरिकांचाही रोष वाढायला लागला. परिणामी याही मार्गाच्या फेरनिविदा करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. परंतु आता तरी कामाला गती मिळणार का? हा प्रश्नच आहे.
वर्धा-आर्वी
- वर्धा ते आर्वी या ५३.७० किलोमीटरच्या महामार्गाकरिता ३०६.२० कोटींचा निधी मंजूर झाला असून, गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाची पद्धत सुरुवातीपासूनच त्रासदायक राहिल्याने अडचणींचा सामना करावा लागता. आता हे काम अंतिम टप्प्यात असून, अजूनही बऱ्याच ठिकाणचे काम बाकी आहे. आर्वीजवळच बरेच काम अद्याप होणे बाकी आहे.
तळेगाव गोणापूर चौकी
- तळेगाव (श्याम.पंत) ते अमरावती जिल्ह्यातील गोणापूर चौकीपर्यंतच्या ४३.३० किलोमीटर मार्गाकरिता २६४.४९ निधी मंजूर झाला असून, या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कामाला सुरुवात झाली पण, अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.