हिगणघाटची ऋतिका जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:17 PM2018-05-30T23:17:32+5:302018-05-30T23:17:51+5:30
शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे. सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेनेच दिला आहे.
जिल्ह्यात द्वितीय स्थानावर दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात न्यू इंग्लीश हायस्कूल वर्धा येथील विज्ञान शाखेची श्रूती संतोष मुरारका तथा आर.के. कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव येथील प्रज्वल यशवंत घाटे यांनी ६२४ (९६ टक्के) गुण प्राप्त केले आहेत. तृतीय स्थानावर जे.बी. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेत्रा विजय कडू हिने ६२३ (९५.८४ टक्के) गुण प्राप्त करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे.
यंदा जिल्ह्यातील १२४ उच्च माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यातील १७ हजार ५२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले होते. यापैकी १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला आहे. हा निकाल मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने निकालाची टक्केवारी घटल्याचेच दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याने शेवटून दुसरा क्रमांक राखला आहे. सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा लागला असून त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा क्रमांक लागतो. वर्धा जिल्ह्यातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यात ८ हजार ८२३ मुले तर ७ हजार ७१७ मुलींचा समावेश होता. पैकी ८ हजार ८१८ मुले व ८ हजार ७१० मुली अशा १७ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यात ६ हजार ७९३ मुले आणि ७ हजार ७०० मुली असे १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल एकूण ८२.६८ टक्के लागला असून मुलींच्या निकाली टक्केवारी ८८.४० तर मुलांची ७७.०४ आहे. यावरून इयत्ता बारावीच्या परीक्षेतही मुलींनीच भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमानही मुलींनीच पटकाविल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
इयत्ता बारावीमध्ये सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागलेला आहे. विज्ञान शाखेतील ९५.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२९ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ७४.११ टक्के तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा ७०.९४ टक्के लागलेला आहे.
सीए होण्यासाठी अभ्यासाला केला प्रारंभ
नागपूर बोर्डातून, राज्यात मुलींतून तथा वर्धा जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ऋतिकाला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रात १०० गुण आहेत. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अथक परिश्रमातून हे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले. भविष्यात सी.ए. होण्याची महत्त्वाकांक्षा असून त्या दृष्टीने बारावीची परीक्षा होताच सी.ए. ची तयारी सुरू केल्याचे सांगितले. विविध विषयाची पुस्तके वाचण्याचा छंद तिला बालपणापासून आहे. दहावीत तिला ९४ टक्के गुण होते. तिच्या वडिलांचे येथील इंदिरा गांधी वॉर्डात किराणा दुकान असून आई माधुरी गृहिणी आहे. तिची मोठी बहीण अंजली नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेते आहे तर लहान भाऊ अनुज प्राथमिक शाळेत शिकत आहे. फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने यश प्राप्त केल्याचा आनंद तिच्या कुटुंबीयांच्या चेहºयावर विलसत होता. रितिकाने यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य विष्णू इटनकर व शिक्षकांना दिले.