हिंदी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत घोळ
By admin | Published: June 30, 2016 02:22 AM2016-06-30T02:22:12+5:302016-06-30T02:22:12+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एमफील आणि आचार्य पदवीकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
अभाविपचा आरोप : पुनर्परीक्षा घेण्याची मागणी
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एमफील आणि आचार्य पदवीकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याबाबत कुलपती व कुलसचिवांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी गुणवंत विद्यार्थ्यांची समिती तयार करून त्यांच्या समक्ष करावी आणि परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, विवरणिकेमध्ये प्रकाशित प्रवेश नियमांच्या विरूद्ध भेदभावपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी, प्रवेश परीक्षमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांकरिता एकच प्रश्न पत्रिका देणे, ही बाब विद्यार्थ्यांच्या हिताविरूद्ध आहे. यामुळे आचार्य पदवी व अन्य अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता एकच प्रश्नपत्रिका दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांना एकसम लेखल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. यामुळे परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषींविरूद्ध कठोर कार्यवाही करावी. प्रवेश परीक्षा २०१६ रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अभाविप हिंदी विद्यापीठ शाखेचे बिमलेश कुमार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)