हिंगणघाट जळीत प्रकरण : ३५४(ड)तून ‘विकेश’ निर्दोष; पण ३०२ मध्ये ठरला दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:56 AM2022-02-14T10:56:06+5:302022-02-14T11:06:41+5:30
हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल भिवा भागवत यांनी भादंविच्या कलम ३०२ (खून) अन्वये दोषी ठरवून त्यास आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
महेश सायखेडे
वर्धा : बहूचर्चित हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याची हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कलम २३५(१) अन्वये भादंविच्या कलम ३५४ (ड) (सातत्याने पाठलाग)मधून निर्दोष मुक्तता केली असली तरी भरचौकात अंकिताला जाळून ठार करणाऱ्या विकेश नगराळे याला हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल भिवा भागवत यांनी भादंविच्या कलम ३०२ (खून) अन्वये दोषी ठरवून त्यास आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जाहीर केलेला हा निकाल तब्बल १५६ पानांचा आहे.
हा योगायोगच...
हिंगणघाट जळीत प्रकरणातील प्राध्यापिका अंकिता पिसूड्डे हिला विकेश उर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० ला सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात अंगावर पेट्रोल टाकून आगीच्या हवाले केल्याने तिला गंभीर जखमी अवस्थेत नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याच ठिकाणी तिची मृत्यूशी झुंज सुरू असताना १० फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे ६.५५ वाजता तिचा मृत्यू झाला. तर १० फेब्रुवारी २०२२ म्हणजे अंकिताच्या द्वितीय स्मृृतीदिनी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सेशन केस क्रमांक १०/२०२० या खटल्यात विकेशला शिक्षा ठोठावली.
तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले होते शवविच्छेदन
अंकिता पिसूड्डे हिच्या मृतदेहाचे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. ऋषिकेश पाठक आणि दोन तज्ज्ञ डॉक्टरांनी शवविच्छेदन केले होते.
साक्षदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
हिंगणघाट जळीत प्रकरणात एकूण २९ साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. यात एका प्राचार्यांसह दोन प्रत्यक्षदर्शी, तीन पंच, तीन वैद्यकीय अधिकारी, नऊ पोलीस अधिकारी व कर्मचारी, दोन टेलिकॉम कंपनीचे नोडल अधिकारी आणि इतर सहा साक्षीदारांचा समावेश होता. हिंगणघाट जळीत प्रकरणात साक्षीदारांची साक्ष महत्त्वाचीच राहिली.
दोन न्यायाधीशांसमोर राहिला खटला
हिंगणघाट जळीत प्रकरणाचा खटला हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालला असला तरी हा खटला एकूण दोन न्यायाधीशांच्या डोळ्यासमोर राहिला. सुरुवातीला हा खटला हिंगणघाट येथील तत्कालीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांच्या न्याय पटलावर चालला. पण त्यांची बदली झाल्याने आणि त्यांच्या जागी राहुल भिवा भागवत हे हिंगणघाट येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून रुजू झाल्याने त्यांच्या न्याय पटलावर या खटल्याचे पुढील कामकाज चालले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला शिक्षा ठोठावली.