हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : नेमकं काय घडल होतं 'त्या' दिवशी? जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 10:28 AM2022-02-10T10:28:14+5:302022-02-10T17:38:30+5:30
हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वर्धा : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या हिंगणघाटातील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला न्यायालयाने दोषी करार दिल्यानंतर आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. थरकाप उडविणाऱ्या या जळीतकांड प्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, जाणून घेऊया.
विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून आगीच्या हवाली केलेल्या अंकिताला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी मृत्यूशी झुंज देत असलेली अंकिता केवळ हातवारे करून काय हवे ते सांगत होती. अशातच १० फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे ६.६६ वाजता अंकिताची प्राणज्योत मालवली.
याच दिवशी नागपूर येथील रुग्णालयातून अंकिताचे पार्थिव तिचे मूळ गाव असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात आणण्यात आल्यावर सायंकाळी ५.०८ वाजता तिच्या वडिलांनी तिला मुखाग्नी दिला. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्याचे आणि तिच्या मूळ गावी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने अंकिताला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागरच तिच्या मूळ गावी उसळला होता.
याही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७.३० वाजतापासूनच तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात नागपूर-हैद्राबाद मार्गावरील जाम, हिंगणघाट,वडनेर तसेच दारोडा परिसरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ११.३० वाजताच्या सुमारास अंत्यविधीचे साहित्य दारोडा गावात आणण्यात येताच नागपूर-हैद्राबाद मार्गावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनानेही दारोडा गावातील स्मशानभूमी परिसर जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ केला.
अंकिताचे पार्थिव घेऊन नागपूर येथून निघालेली रुग्णवाहिका १,०५ वाजता दारोडा गावातील बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्तात पाेहोचली. त्यानंतर काही नागरिकांनी रुग्णवाहिका रोखली. सुमारे २० मिनिटे लोटूनही संतप्तांकडून रुग्णवाहिका पुढे जाऊ दिली जात नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. दरम्यान, रोष व्यक्त करणाऱ्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर पोलीस बंदोबस्तात अंकिताचे पार्थिव असलेली रुग्णवाहिका दारोडा गावातील गजानन महाराज मंदिरापर्यंत आणण्यात आली. अशातच संतप्तांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात रुग्णवाहिकेच्या दर्शनीय भागाच्या काचा फुटल्या. शिवाय काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत. त्यामुळे पोलिसांनीही दोन पाऊल मागे घेत पुन्हा नव्या जोमाने दुपारी १.१८ वाजता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करून आगेकूच केली. अंकिताचा मृतदेह दुपारी १.२६ वाजता तिच्या घरी नेण्यात आला. बाहेरगावावरून दारोडा गावात परतलेल्या भावाने अंकिताच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यावर अंकिताची अंत्ययात्रा तिच्या घरापासून सुमारे अर्धा किमी दूर असलेल्या गावातीलच स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाली.
स्मशानभूमीत तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर सायंकाळी ५ वाजता सरण रचण्यात आले. आणि त्यानंतर ५.०८ वाजता अंकिताच्या वडिलांनी तिला मुखाग्नी दिल्यावर नि:शब्द 'ती' अनंतात विलीन झाली. तर आता याच प्रकरणातील आराेपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडिता अनंतात विलीन झाल्यावर दोन वर्षांनंतर हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
तो दिवस जखमी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणात
मृत अंकिताचे पार्थिव तिच्या मूळ गावातील घरी नेल्या जात असताना संतप्तांकडून दगडफेक करण्यात आली होती. यात कर्तव्यावर असलेल्या दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांसह एकूण नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले हाेते. आजही १० फेब्रुवारी २०२० हा दिवस या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणात आहे.
हिंगणघाट पोलिसांनी ९६ व्यक्तींना केले होते स्थानबद्ध
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने हिंगणघाट होत मृत अंकिता हिचे पार्थिव हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात नेल्या जात असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट पोलिसांच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून त्यावेळी सुमारे ९६ व्यक्तींना ताब्यात घेत पोलीस स्टेशनच्या आवारात स्थानबद्ध करण्यात आले होते. तर नंतर अंकितावर अंत्यसंस्कार पार पडल्यावर या व्यक्तींची सुटका करण्यात आली होती.
१० फेब्रुवारी २०२० हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी आपण बहुचर्चित हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील मृत अंकिता हिचे पार्थिव रुग्णवाहिकेच्या साहाय्याने तिच्या मूळ गावातील घरी नेत होतो. रुग्णवाहिका दारोडा गावातील गजानन महाराज मंदिर जवळ आली असता अचानक संतप्तांकडून दगडफेक झाली. यावेळी आपण रुग्णवाहिकेच्या अगदी समोर होतो. संतप्तांकडून पोलिसांकडे आलेला जो दगड आपण चुकविला तोच रुग्णवाहिकेच्या दर्शनीय काचावर पडला होता.
- नीलेश ब्राह्मणे, तत्कालीन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा.