हिंगणघाट जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:19 AM2020-02-22T03:19:31+5:302020-02-22T03:20:21+5:30
१५० पानांचे दोषारोपपत्र; विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती रखडली
महेश सायखेडे
वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. महिला तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्याकडून येत्या काही दिवसात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. हे दोषारोपपत्र सुमारे १५० पानांचे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सुमारे आठ दिवस या प्रकरणातील पीडितेने मृत्यूशी झुंज दिली. त्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या प्रकरणात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला नागपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अद्याप कोणताही पत्रव्यवहार नाही!
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे आश्वासन राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र अॅड. उज्ज्वल निकम यांना हा खटला चालविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार शासनाने केला नसल्याची माहिती पुढे आहे. पीडित युवतीचे कुटूंबीय संतप्त झाले असून शासनाच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडितेचा मृत्यु झाला त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित युवतीच्या वडीलांना प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल व विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक शासन करेल असे आश्वासन दिले होते.