हिंगणघाट जळीत प्रकरण: नकार पचविणे अवघड गेल्याने नराधमाने केले अमानुष कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:21 AM2020-02-07T04:21:19+5:302020-02-07T06:26:18+5:30
भर रस्त्यात प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देणारा आरोपी विक्की नगराळेने पीडितेला लग्नाची गळ घातली होती.
वर्धा : भर रस्त्यात प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देणारा आरोपी विक्की नगराळेने पीडितेला लग्नाची गळ घातली होती. परंतु उच्च शिक्षीत पीडितेचा नकार पचविणे नराधमाला कठीण गेल्याने त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी ६ साक्षदारांची जबाब नोंदविले आहेत.
आरोपी विकेश नगराळे याने लग्नापूर्वी पीडितेला लग्नाची गळ घातली होती. त्याचा विवाह होऊन त्याला एक मुलगी झाली आहे. असे असतानाही तो वारंवार फोन करुन पीडितेला त्रास देत होता. २४ जानेवारी रोजी दोघांनी भेटण्याचे ठरविले. भेटल्यानंतर पीडितेने विकेशला वारंवार फोन का करतो, माझा पाठलाग का करतो, यानंतर मला फोन करायचा नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळे अपमानित झालेल्या विकेशने पीडितेला संपविण्याचाच कट रचला.
आरोपी विक्कीने रविवारी रात्रीच हल्ल्याची तयारी केली होती. सोमवार उजाडताच त्याने पहाटे गाव सोडून हिंगणघाट येथील नंदोरी चौक गाठला. तेथून महाविद्यालयाकडे पायी जात असलेल्या प्राध्यापिकेला गाठून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपीची पत्नी म्हणाली...
विकेशने आपल्या लहान मुलीचा विचार करायला हवा होता. तो असे काही करेल, असे वाटले नव्हते. घटनेच्या आदल्या दिवशी ते प्रचंड अस्वस्थ होते. फोनवर कुणाशी तरी बोलत होते. दुसऱ्या दिवशी ते पहाटेच घराबाहेर पडले आणि काही वेळातच या भयावह घटनेची माहिती पोलिसांकडूनच आम्हा परिवारातील सदस्यांना मिळाली, असे आरोपीच्या पत्नीने सांगितले.
ही घटना अत्यंत खेदजनक आहे,भर रस्त्यावर ही घटना झाली, प्रथमदर्शीच आरोपीला लोकांनी बघितले आहे आणि असे आरोपी मानवाधिकार कक्षेतून बाहेर असायला पाहिजे. अशी प्रकरणे एक महिन्यात निकाली काढून आरोपीस सार्वजनिक स्थळी फाशी व्हावी जेणेकरून असे गुन्हे करताना लोकांना जबर बसेल.
- डॉ. अंजली साळवे, माजी समुपदेशक, तक्रार व तपास विभाग, राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली.
धाकच राहिला नाही
निर्भया हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतरही वारंवार तारीख बदलविली जात आहे. त्यामुळे देशात कायद्याचा धाक राहिला नसल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होतो. इतकेच नव्हे, तर पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी आमदार विद्या चव्हाण यांनी वर्धा येथे पत्रपरिषदेत व्यक्त केले.
हैदराबादसारखं करा
हिंगणघाटच्या नराधमाला हैदराबादसारखी शिक्षा द्या, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे केली.