हिंगणघाट जळीत प्रकरण; निकालामुळे न्यायालय परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 07:00 AM2022-02-10T07:00:00+5:302022-02-10T07:00:22+5:30

Wardha News संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Hinganghat burning case; The verdict gave the court premises the appearance of a police camp | हिंगणघाट जळीत प्रकरण; निकालामुळे न्यायालय परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप

हिंगणघाट जळीत प्रकरण; निकालामुळे न्यायालय परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप

Next
ठळक मुद्दे१३ अधिकारी, ९८ कर्मचारी अन् आरसीपीच्या प्लाटूनचा खडा पहारा

भास्कर कलोडे

वर्धा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी तब्बल १३ अधिकारी, ९८ कर्मचारी तसेच दंगल नियंत्रक पथकाने खडा पहारा दिल्याने हिंगणघाटच्या न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

अशी होती घटना

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले. या प्रकरणाचा निकाल बुधवार, ९ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयापासून १०० ते १५० मीटरपर्यंतचा परिसर पोलिसांनी सील करून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर हे स्वत: न्यायालय परिसरात हजर होते.

आज जाहीर करणार निकाल

बुधवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी आरोपी विकेश नगराळे याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दोन्ही बाजूंचे शिक्षेबाबतचे मत जाणून घेतल्यावर गुरुवार, १० फेब्रुवारीला न्यायाधीश आर. बी. भागवत निकाल जाहीर करणार असल्याचे ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

मंगळवारी सूर्य मावळल्यापासून तालुका होता हाय अलर्टवर

प्रकरणाचे पडसाद हिंगणघाट तालुक्यात ठिकठिकाणी उमटले होते. बुधवारी या प्रकरणाचा निकाल असल्याने मंगळवारी सूर्य मावळतीला जाताच हिंगणघाट तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाय अलर्टवर राहून तालुक्यातील प्रत्येक गावावर बारकाईने नजर ठेवली होती.

महत्त्वाचे

* १०.५७ वाजता आरोपीचे वकील ॲड. भूपेंद्र साेने, ॲड. शुभांगी कोसरे कुंभारे, सुदीप मेश्राम यांचे न्यायालयात आगमन झाले.

* १०.५८ वाजता विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम व ॲड. दीपक वैद्य यांचे आगमन झाले.

* ११.०० वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत न्यायालयात दाखल झाले.

* ११.२५ वाजता पोलीस बंदोबस्तात आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयात आणण्यात आले.

* ११.३० वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली.

* १२.१५ वाजता प्रकरणाचे कामकाज संपले.

* पीडितेच्या आई-वडिलांची न्यायालयात उपस्थित होते.

Web Title: Hinganghat burning case; The verdict gave the court premises the appearance of a police camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.