हिंगणघाटकर जागविणार ‘ब्रिटिश’ अधिकाऱ्याच्या स्मृती; वर्धा जिल्ह्यात तब्बल १३ वर्षे होते वास्तव्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:06 PM2023-01-20T12:06:43+5:302023-01-20T12:12:45+5:30

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा स्मृतिदिन समाधिस्थळी होणार साजरा

Hinganghat citizens will awaken the memory of the 'British' officer who lived in Wardha dist for almost 13 years | हिंगणघाटकर जागविणार ‘ब्रिटिश’ अधिकाऱ्याच्या स्मृती; वर्धा जिल्ह्यात तब्बल १३ वर्षे होते वास्तव्यास

हिंगणघाटकर जागविणार ‘ब्रिटिश’ अधिकाऱ्याच्या स्मृती; वर्धा जिल्ह्यात तब्बल १३ वर्षे होते वास्तव्यास

Next

वर्धा : ग्रेट ट्रिग्नामेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे जनक कर्नल विल्यम लॅम्बटन या ऐतिहासिक पुरुषाचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात तब्बल १३ वर्षे वास्तव्य होते. इतकेच नव्हे तर त्यांनी अखेरचा श्वासही हिंगणघाट शहरातच घेतला. त्यांच्या मृत्यूला २० जानेवारी २०२३ रोजी २०० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचे महान कार्य लक्षात घेता हिंगणघाटातील त्यांच्या समाधिस्थळी त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहे.

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा जन्म १७५३ मध्ये उत्तर यॉर्कशायरमधील नॉर्थ अलर्टनजवळ क्रासबेग्रेंज येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी भारतीय सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून १० एप्रिल १८०२ मध्ये केली होती. ते सर्वेक्षण इतिहासातील सर्वांत मोठे साहसी, महत्त्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या अत्यंत किचकट असे व्यक्तिमत्त्व होते. हिंगणघाट येथे १३ वर्षे वास्तव्यास असताना वयाच्या ७० व्या वर्षी २० जानेवारी १८२३ रोजी येथे अनपेक्षितरीत्या त्यांचा मृत्यू झाला. आजवर त्यांची समाधी दुर्लक्षित होती. मात्र, त्यांचे महान कार्य लक्षात घेता शहरातील दुर्लक्षित ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे, तसेच त्यांची माहिती राष्ट्रीयस्तरावर पोहोचविण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, लोक प्रसारक मंडळ, निसर्ग साथी फाउंडेशन, पर्यावरण संस्था, वणा नदी संवर्धन या संस्थांनी पुढाकार घेऊन नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहे.

जनजागृतीसाठी निघाली होती सायकल रॅली

कर्नल विल्यम लॅम्बटन यांच्या द्विशताब्दी समारोहानिमित्त जनजागृती व्हावी यासाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने फिरून त्यांच्या स्मृतिस्थळावरील समाधीला गुलाबपुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. रॅलीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवकांची उपस्थिती होती.

दुर्लक्षित समाधिस्थळाचा जागतिक स्तरावर करणार प्रसार : कुणावार

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. याची माहिती जिल्हाभर नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्नल विल्यम यांच्या द्विशताब्दी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निमंत्रित करणार आहे. त्यासाठी विविध समित्या गठित केल्या जाणार आहेत, असे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.

Web Title: Hinganghat citizens will awaken the memory of the 'British' officer who lived in Wardha dist for almost 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.