हिंगणी गटाकडे लागले तालुक्याचे लक्ष
By admin | Published: January 15, 2017 12:52 AM2017-01-15T00:52:14+5:302017-01-15T00:52:14+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि पंचायत समितीच्या १२ गणासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.
उमेदवाराबाबत उत्सुकता : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
सेलू : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि पंचायत समितीच्या १२ गणासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. सर्वत्र निवडणुकीची चर्चा रंगात आली असताना हिंगणी गटातील उमेदवाराकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मतदानाची तारीख जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. हिंगणी गटात मागील निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथून विजयी झालेल्या चित्रा रणनवरे या जि.प. अध्यक्ष आहेत. यावेळी हिंगणी गट खुला प्रवर्गासाठी असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जोर कसला आहे. या गटातून निवडणूक लढविण्यास भाजपाकडे इच्छुकांची गर्दी असून जि.प. सदस्य राणा रणनवरे व शहर भाजपा अध्यक्ष वरूण दप्तरी यांचे नाव आघाडीवर आहे. काँगे्रसकडून माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजय डेकाटे यांचे नाव चर्चेत आहे. महेंद्र माहुरे अपक्ष लढणार असल्याचा तर्क आहे.
हिंगणी गणात काँग्रेसकडून नितीन निधडे, प्रवीण तोटे, भाजपाकडून अशोक डेकाटे, अनिल बोकडे तर राष्ट्रवादीकडून अमर कोकाटे यांचे नाव चर्चेत आहे. अशोक मुडे या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार काय याकडे राजकीय जानकारांचे लक्ष लागले आहे. घोराड गणात भाजपाकडे अनेक इच्छुक आहे. बाजार समितीचे संचालक विलास वरटकर, तालुका भाजयुमोचे अध्यक्ष विकास मोटमवार, घोराड ग्रा.पं.चे उपसरपंच अमित तेलरांधे अशी नावे आहे. काँग्रेसकडून संजय धोंगडे, अशोक येळणे, प्रहार पक्षाकडून मिलिंद गोमासे यांचे नाव असून या गणातून मागील निवडणुकीत विजयी झालेल्या रजनी तेलरांधे आगामी निवडणुकीत पुन्हा अपक्ष उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. यात भाजप कोणत्या उमेदवाराची निवड करते याबाबत उत्सुकता आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचे विजय जयस्वाल व भाजपाचे राणा रणनवरे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीमुळे येळाकेळी गट चर्चेत होता. यावेळी जयस्वाल विरूद्ध रणनवरे अशी लढत हिंगणी गटात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदारांचे लक्ष हिंगणी गटाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)