‘त्या’ इसमाचा मृतदेह रात्रभर रेल्वे रूळाशेजारीच
By admin | Published: May 29, 2017 01:06 AM2017-05-29T01:06:35+5:302017-05-29T01:06:35+5:30
पुलगाव लगतच्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाजवळ रेल्वे अपघातात एक इसमाचा मृत्यू झाला.
तब्बल १२ तासांनी उचलला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलगाव लगतच्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाजवळ रेल्वे अपघातात एक इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना होताच त्यांनी मृतदेह उचलून रूळाशेजारी ओट्यावर ठेवला. तो सकाळपर्यंत तसाच राहिला. तब्बल बारा तासांनी रेल्वे पोलीस घटनास्थळी येत पंचनामा करून रविवारी सकाळी १० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. हरिष ठाकरे असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हरिष आपले काम आटोपून घराकडे जात असताना रेल्वेने दिलेल्या धडकेत गतप्राण झाला. याची माहिती रेल्वे पोलिसांना वेळीच मिळाली नसती तर मृतदेह रात्रभर दुर्लक्षित होणे स्वाभाविक आहे. घटनेच्या माहितीनंतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते रेल्वे रूळावरील मृतदेह उचलून बाजूला ठेवत त्याकडे दुर्लक्ष करणे हे रेल्वे पोलिसांच्या असहिष्णुतेचे दर्शन घडविणारे आहे. घटना माहिती झाल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करीत पुढील कारवाईसाठी पाठविणे क्रमप्राप्त होते. मात्र येथे तसे झाली नाही. मृतदेह तब्बल १२ तास तसाच पडून राहिला.
घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पंचनामा व्हायचा आहे असे म्हणत मृतदेह देण्यास नकार दिला. यावेळी रेल्वे रूळावर बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
त्या इसमाची ओळख पटली नाही
वर्धा : दहेगाव ते कवठा दरम्यानच्या रेल्वे मार्गावर गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या इसमाला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्यापही त्या इसमाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.
पुलगाव जीआरपीएफला एकच कर्मचारी
पुलगाव रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलीस चौकीत एकच कर्मचारी कार्यरत आहे. एकाच कर्मचाऱ्यांवर भार असल्याने हा घडल्याचे सांगण्यात आले.