इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:45 AM2017-09-18T00:45:24+5:302017-09-18T00:45:37+5:30
नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांच्या हाती काहीच आले नाही.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतक गोपालदास चांडक यांच्या तोंडात कापड कोंबून असल्याचे दिसून आले आहे. शिवाय त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. गोपालदास त्यांच्या घरी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दारातून प्रवेश केला. त्यांना पैशाची किंवा तिजोरीच्या चाव्यांची मागणी केली असावी, त्या देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली असावी हे सांगणे अवघड असल्याचेही पोलीस बोलत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पी.एस.आय. बांडे करीत आहे.
पोलिसांना सदर घटनेची माहिती नांदपूर येथील सरपंचाने दिली. घटना माहिती मिळताच आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार एस. कोल्हे, ठाणेदार अशोक चौधरी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.
घटनेच्या वेळी गोपालदास घरी एकटेच
गोपालदास घरी एकटेच होते. त्यांची पत्नी मुलीकडे गेली होती. शिवाय नांदपूर येथे असलेले त्यांचे किराणा दुकान चालवणारा त्यांचा मुलगा रात्री दुकान बंद करून आर्वी येथील घरी गेला होता. त्यामुळे रात्री घरी गोपालदास एकटेच होते. याच संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
बोटातील सोन्याच्या अंगठ्या कायम
सदर हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र गोपालदास यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या तशाच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे.
श्वान पथकही निकामी
घटनेची माहिती होताच सुगावा मिळावा याकरिता पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथकालाही काहीच सुगावा लागला नाही.