ऐतिहासिक सारंगपुरी तलाव पर्यटनस्थळ टाकतेय कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:19+5:30
शहराच्या पर्यटनविकासात भर घालणाऱ्या दुर्लक्षित सारंगपुरी तलावाच्या कायापालट करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी विशेष प्रयत्न केले. पुनरुज्जीवनाकडे लक्ष देत वास्तुविशारदांकडून नकाशा तयार केला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी साडेचार कोटींचा प्रस्ताव आमदार दादाराव केचे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविला. प्रस्तावानंतर निधी मंजूर झाल्यास या तलावाला गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : ऐतिहासिक तथा एकेकाळी आर्वीकरांना जीवनदायी ठरलेला सारंगपुरी जलाशय पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्याचे कामही सुरू झाले असून पहिला टप्पा शासनाने मंजूर केला आहे. नगरपालिकेच्या अखत्यारित असलेला हा तलाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित हाता. आता या पर्यटनस्थळाचे रुपडे पालटणार असल्याने येथील विकासकामे उत्तररित्या व्हीवी, अशी मागणी आर्वीकरांकडून होत आहे.
शहराच्या पर्यटनविकासात भर घालणाऱ्या दुर्लक्षित सारंगपुरी तलावाच्या कायापालट करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी विशेष प्रयत्न केले. पुनरुज्जीवनाकडे लक्ष देत वास्तुविशारदांकडून नकाशा तयार केला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी साडेचार कोटींचा प्रस्ताव आमदार दादाराव केचे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविला. प्रस्तावानंतर निधी मंजूर झाल्यास या तलावाला गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०१६-१७ अंतर्गत या सारंगपुरी तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली होती. जिल्हा नियोजन समितीमार्फत स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आवश्यक माहिती व रकमेसह अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी शासनाकडे अंदाजपत्रकही सादर केले होते. त्यानुसार २७ मे २०१९ रोजी २ कोटी ९६ लाख ७२ हजार रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले. या कामाकरिता शासनाकडून ६५ लाख रुपयांचा पहिला टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला.
त्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली असून सहा एकरात हे काम होत आहे. सध्या प्रशासकीय इमारत, उपाहारगृह व पश्चिमेकडील संरक्षण भिंतीचे कामही सुरू आहे. हे काम कंत्राटदाराला बारा महिन्यांत पूर्ण करायचे आहे. यामध्ये झोपड्या, मुख्य प्रवेशद्वार, खेळण्याचे विविध प्रकार, बांबू मंचानी, बगिचे आणि शिडी, नैसर्गिक वातावरण, बोटिंग व्यवस्था, कार्यालय, बालोद्यान, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आदींसह २७ सुविधांचा समावेश आहे.
तलावाची होती गिनीज बुकात नोंद
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी आर्वी विभागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून निसर्गरम्य अशा ठिकाणी १९१७ ला सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली होती. या जलाशयाने १९१७ पासून आर्वीकरांना जलपुरवठा केला. दररोज ११ लाख लिटर पाण्याचा पुरवठा या सारंगपुरी जलाशयातून होता. कोणत्याही यंत्राचा आधार न घेता या जलाशयाचे पाणी नागरिकांच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जात होते. त्यामुळे या यशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली होती.
सारंगपुरी पर्यटनस्थळांसाठी ६५ लाखांचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून कंत्राटदाराचे त्यानुसार काम सुरू आहे. काम पाहून शासन टप्प्याटप्प्याने पैसे देणार आहे. १२ महिन्यांत हे काम कंत्राटदाराला पूर्ण करायचे असून या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. काम निकृष्ट होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
शिवाजी जाठे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी