ऐतिहासिक भोसलेकालीन विहीर घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:29 AM2018-11-28T00:29:02+5:302018-11-28T00:30:11+5:30
येथील जुन्यावस्तीतील रामदरा वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतीहासिक विहीर आहे. परंतु त्याला सध्या अस्वच्छतेचा विळखा असून त्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने हा परिसर व विहीर स्वच्छ केल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते,
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : येथील जुन्यावस्तीतील रामदरा वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतीहासिक विहीर आहे.
परंतु त्याला सध्या अस्वच्छतेचा विळखा असून त्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने हा परिसर व विहीर स्वच्छ केल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते, असे बोलले जात असून त्याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
मागील वर्षी सदर विहिरीचे तोंड बांधुन त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली. परंतु, विहिरीच्या तळापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या आवारात सध्या घाणीने कळस गाठला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने घागर-घागर पाण्यासाठी भटकंतीच करावी लागणार आहे. असे असताना गावातील भोसले कालीन विहिरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रा.पं.च्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर विहीर नदीच्या काठा लगत असून विहिरीतील पाणी उन्हाळ्यातही पाहिजे तसे खोल जात नसल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात. ग्रा. पं. प्रशासनाने भविष्यातील जलसमस्या लक्षात घेवून सदर विहीर स्वच्छ करून विहिरीचा परिसरही स्वच्छ करावा, अशी मागणी गावातील सुजान नागरिकांची आहे.
श्यामजीपंत महाराजांचा इतिहास
अनेक वर्षा इतिहास असलेल्या या भोसलेकालीन विहीर वजा वास्तुला श्यामजीपंत महाराज यांचा इतिहास जुळला आहे. यामुळे गावाला श्यामजीपंताचे तळेगांव अशी ओळख असल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात. या विहिरीचे जतन करून सदर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.