कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो; सहा हजार चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 05:00 AM2021-06-25T05:00:00+5:302021-06-25T05:00:13+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील नियमांना केराची टोपली दाखवून अनेकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे ठोठावलेल्या दंडावरून लक्षात येते आहे. विनाहेल्मेट, नो पार्किंग, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसीट, कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस शाखेकडून कारवाई करण्यात आली. गतवर्षी विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या १८१ जणांकडून ९०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २१६ जणांना ई चलन देण्यात आले.

The hoarse horn can also be heard by the police; Action on six thousand drivers | कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो; सहा हजार चालकांवर कारवाई

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो; सहा हजार चालकांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक नियम मोडणाऱ्यांना ठोठावला दंड : वाहतूक शाखेकडून कारवाईला गती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट नागरिक पेलत आहेत. अशातच प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. दोन वर्षांत कोटी रुपयांचा दंड वाहतूक शाखेने ठोठावल्याची माहिती आहे. पोलिसांनी गेल्या दीड वर्षात म्युझिक हॉर्न वाजविणाऱ्या ६ हजार ३१० चालकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील नियमांना केराची टोपली दाखवून अनेकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे ठोठावलेल्या दंडावरून लक्षात येते आहे. विनाहेल्मेट, नो पार्किंग, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसीट, कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस शाखेकडून कारवाई करण्यात आली. गतवर्षी विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या १८१ जणांकडून ९०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २१६ जणांना ई चलन देण्यात आले. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या २,२३६ चालकांकडून ४ लाख ४७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ९३५  जणांना ई चलन देण्यात आले. इतकेच नव्हे, तर कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांच्याही मुसक्या वाहतूक पोलिसांनी आवळल्या. त्यामुळे पोलिसांनाही म्युझिकल हॉर्न ऐकू येतो, यावरून हे लक्षात येत आहे. वाहतूक पोलिसांनी आपल्या कारवाईला अधिक गती दिली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

म्युझिकल हॉर्नची फॅशन 
शहरातील रोडरोमिओ आपल्या दुचाकीला म्युझिकल हॉर्न, प्रेशर हॉर्न लावून रस्त्यावरून सैरभैर आवाज करताना दिसून येतात. अशा म्युझिकल हाॅर्नची सध्या शहरासह ग्रामीण भागात क्रेझ निर्माण झाली आहे. गुंडगिरी प्रवृत्तींच्या युवकांच्या वाहनांना असे हॉर्न अलगद पाहावयास मिळतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा कर्णकर्कश हॉर्न असलेल्या वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई यापुढेही निरंतर सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
 

कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...
- शहरातील अनेक प्रतिबंधीत क्षेत्रात हॉर्न वाजविण्यावर बंदी आहे. मात्र, असे असतानाही अनेक वाहनचालक प्रेशर हॉर्न वाजवून नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचे काम करतात. 
- वाहतूक पोलिसांना असे आढळून आल्यास अशांवर कलम ११९ / ११७ नुसार कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
- तसेच वाहनचालकाला चलन देत त्यांच्याकडून ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो. 

कानाचेही आजार वाढू शकतात
- कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. शहरात अनेक युवकांचे टोळके कर्णकर्कश हॉर्न वाजवून विनाकारण त्रास देण्याचे काम करताना दिसतात. 
- मुख्यत: आर्वी नाका, बॅचलर रोडवर सायंकाळच्या सुमारास म्युझिकल हॉर्न, प्रेशर हॉर्न वाजवत वाहने पळवत असल्याने इतर वाहनधारकांना याचा नाहक त्रास होतो. 
- इतकेच नव्हे, तर हॉर्नच्या आवाजाने अनेकांचे अपघातही होतात. कानाच्या पडद्यालाही दुखापत होण्याची शक्यता असते. 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अनेकांवर दंडात्मक कारवाई करीत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर अनेकांना ई चलन देण्यात आले आहे. त्यांच्याकडून दंडाची रक्कम येणे बाकी आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नियमोल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- राजेश कडू, पोलीस निरीक्षक.   वाहतूक नियंत्रण शाखा.

 

Web Title: The hoarse horn can also be heard by the police; Action on six thousand drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.