अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द मुख्याध्यापक व शिक्षकांचे धरणे
By admin | Published: September 21, 2015 02:04 AM2015-09-21T02:04:47+5:302015-09-21T02:04:47+5:30
शालेय शिक्षण विभागाच्या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ..
मागण्यांचे शासनाला निवेदन : अध्यादेशातील तरतुदी अन्यायकारक
ंवर्धा : शालेय शिक्षण विभागाच्या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निदर्शने दिली. यावेळी संघटनेने केलेल्या मागण्यासंदर्भात शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
शिक्षणक्षेत्रात प्रचंड उलथापालथ होऊ घातली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायद्याची अंमलबजावणी राज्याच्या शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे या कायद्याच्या सोयीने अर्थ लावून शासन संभ्रमित, संदिग्ध आहे. १८ आॅगस्ट २०१५ चा निर्णय निर्गमित करताना ग्रामीण आणि शहरी विभागातील प्रत्यक्ष अडचणी व समस्यांचा कोणताही गंभीर विचार न करता शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात भीती आणि असंतोष पसरला आहे. माध्यमिक शाळेला शैक्षणिक व प्रशासकीयदृष्ट्या शाळा संहितेनुसार शाळा असेपर्यंत मुख्याध्यापक अनिवार्य असताना लहान शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद अतिरिक्त होत आहे. यामुळे अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरविले जात आहे.
इयत्ता नववी आणि दहावीला शिक्षकांची संख्या प्रतितुकडी दीडऐवजी एक अशी कमी होत आहे. त्यामुळे संख्या कमी असताना शिक्षकांवर काम लादल्याचा प्रकार होत आहे. यात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. या अन्यायकारक आदेशामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होणार आहे. आरटीईनुसार प्रत्येक शाळेला तीन अंशकालीन शिक्षक अनुज्ञेय असणे गरजेचे आहे. या अन्यायकारक अध्यादेशाविरूध्द मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक यांनी धरणे दिले. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी माजी खासदार विजय मुडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अजय वानखेडे, शिक्षण संस्था संचालक अध्यक्ष सतीश राऊत, हरिभाऊ दंढारे, प्रा. उषाकिरण थुटे, डॉ. अरविंद मालपे, अॅड. शोभा काळे, रमेश धारस्कर, प्रकाश गोडघाटे, शेष बिजवार, मनोहर बारस्कर, शालिनी वाळके, प्रदीप गोमासे व आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)