धनगर समाज संघर्ष समितीकडून वचननाम्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:39 PM2018-12-03T22:39:21+5:302018-12-03T22:39:41+5:30
धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब लक्षात घेता सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महायुतीच्या वचननाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब लक्षात घेता सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महायुतीच्या वचननाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
स्थानिक वंजारी चौकातील अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात संघर्ष समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले होते. त्यानंतरही वारंवार आरक्षण देऊ, असेच सांगितले. मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला; पण धनगर आरक्षणाबाबत सरकारकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळे धनगर जमातीच्या संयमाचा अंत झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र कापडे, सचिव प्रशांत हुलके, कार्याध्यक्ष सुनील धवने, सदस्य दिलीप उपासे, संदीप पुनसे, पवन खुजे, सतीश भोकटे, नरेंद्र ढवळे, देवेंद्र टेकाडे, अनंत पोराटे, संतोष महाजन, चंद्रशेखर भुजाडे, अजय पोराटे, जयंत तिनघसे, सुनील धवने, प्रकाश भोयर, मिलिंद सरोदे, प्रवीण पाटभाजे, शशांक हुलके यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.