जिल्ह्यातील ३,७३० ठिकाणी होळी दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:08+5:30
जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपुरक होळी प्रत्येकाने साजरी करावी असे आवाहन समाजातील प्रत्येक स्तरातून केले जात आहे. त्यावरही काही नागरिक कृती करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मनातील द्वेष आणि राग याची होळीकरून आनंदाच्या रंगाची उधळण करण्याचा सण म्हणजे होळी. याच सणाचे औचित्य साधून जिल्ह्यातील एकूण ३,७३० ठिकाणी सोमवारी सायंकाळी होळी दहन करून नागरिकांनी आनंंदोत्सव साजरा केला. या सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपुरक होळी प्रत्येकाने साजरी करावी असे आवाहन समाजातील प्रत्येक स्तरातून केले जात आहे. त्यावरही काही नागरिक कृती करीत आहेत.
काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती या होळी या सणादरम्यान अनुचित प्रकार करू शकत असल्याने त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात स्थानबद्ध करण्याची मोहिमही पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यात दारू येऊ नये म्हणून दक्षताही पोलीस घेत आहेत.
धुळवडच्या पार्श्वभूमीवर २७ गुन्हेगारांना केले स्थानबद्ध
वर्धा : होळी सणानिमित्त पोलीस विभागाकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असून रामनगर, सावंगी, सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २७ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०, सावंगी (मेघे) ठाण्याच्या हद्दीतील १२ तर सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हेगारांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे. रामनगर ठाण्याकडून निरंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.
८२ गुन्हेगारांवर हद्दपारीची टांगती ‘तलवार’
शहरारात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोकेवर काढले असून शहरातील चौका-चौकात दारूविक्रीची अवैध दुकाने थाटून सर्रास दारू विक्री केल्या जात आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस विभागाने अशांवर कारवाई करीत तब्बल २५ ते ३० गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. पोलीस विभागाने अशा ८२ गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यासर्व गुन्हेगारांना तसेच दारूविक्रेत्यांवर हद्दपारिची टांगती तलवार आहे.
दारूविक्रेत्यांवर नजर
जिल्ह्यात दारूबंदी असताना होळीचे औचित्य साधून काही दारूविक्रेत्यांकडून इतर जिल्ह्यातून विविध ब्रॉण्डच्या दारूची आयात केली जाते. हाच प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच दारूविक्रीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक दारूविक्रेत्यावर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.