होळीच्या गाठीचा गोडवा ओसरतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:53 PM2018-02-27T23:53:10+5:302018-02-27T23:53:10+5:30

सध्याच्या आधुनिक तंत्रयुगात जुन्या प्रथा, परंपरा मागे पडत आहेत. सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल याचे सुतोवाच देतो.

Holi sour sweetness ...! | होळीच्या गाठीचा गोडवा ओसरतोय...!

होळीच्या गाठीचा गोडवा ओसरतोय...!

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रीत घट : गाठीचे भाव स्थिर; मागणी घटल्याने विक्रेत्यांमध्ये चिंता

श्रेया केने ।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : सध्याच्या आधुनिक तंत्रयुगात जुन्या प्रथा, परंपरा मागे पडत आहेत. सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल याचे सुतोवाच देतो. होळीला घरोघरी चिमुकल्यांसाठी गाठी पाठविली जाते; मात्र ही प्रथा कुठेतरी मागे पडत असल्याचे अलिकडच्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. यंदा तर गाठीच्या विक्रीतही तब्बल ४० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
होळीला पूरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तोच गाठीचाही मान आहे. त्यामुळे होळीला घरोघरी गाठीची खरेदी होतेच. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात. शिवाय वाग्दत्त वधूला मान म्हणून गाठी चोळी पाठवतात. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठीची खरेदी होतेच. गाठी गुढीपाडव्याला पुजेत वापरतात. त्यासाठी म्हणून गाठी घेतात. यंदा तर गाठीच्या भावात वाढ झाली नसतानाही विक्री मंदावल्याचे चित्र आहे.
वर्धा शहरात गाठी तयार करणारे कारखाने आहेत. होळीच्या दिवसापर्यंत तिथे गाठी तयार होते. यंदा मात्र गाठीची विक्री झाली नसल्याने कारखाने आणि निर्मिती बंद करावी लागली आहे. यावरून गाठीचा गोडवा कुठेतरी ओसरत असल्याचे जाणवते.
भारतीय सण, उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. गाठी घरोघरी देवून सामाजिक सलोखा कायम राहावा हा उद्देश असावा. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने गाठीचे महत्त्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वापरत असलेल्या या पिढीला गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, असे दिसून येते. फास्ट फुडची ‘के्रझ’ असणाºया सध्याच्या चिमुकल्यांच्या गळ्यात होळीला गाठी विरळच दिसून येते. हे देखील विक्री कमी होण्यामागील एक कारण असू शकते. शिवाय आजकाल संदेश पाठवुन शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे.
व्हर्च्युअल जगात समाज माध्यमांचा वापर वाढला असून ते मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरतात. होळी सणाचे संदेश मोबाईलवर दोन दिवसांपूर्वीपासून खणखणत असताना गाठीचा खाऊ मात्र कुठेतरी हरवत असल्याचे दिसते.
यंदा विक्रीत ४० टक्क्यांनी घट
होळीच्या सणाला जसे रंगाचे महत्व तेच गाठीचेही आहे. त्यामुळे होळी सणाच्या पूर्वी गाठीची हमखास खरेदी केली जाते. मात्र यंदा गत काही वर्षाच्या तुलनेत विक्री ४० टक्के मंदावली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी होळीच्या दिवसापर्यंत कारखाना सुरू ठेवावा लागते. यंदा विक्री जास्त झाली नसल्याने कारखाने बंद ठेवून निर्मिती थांबविली आहे. मजूरी वाढली, कच्चा मालाचे भाव वाढले. त्यामुळे निर्मिती खर्चही वाढला. तुलनेने गाठीला बाजारात उठाव नसल्याने खर्च अधिक होत असल्याचे स्थानिक विक्रेते ऋतुराज चुडीवाले यांनी सांगितले.
साखरेचे भाव वाढले
गाठी तयार करण्यासाठी ‘एम’ ग्रेडची साखर वापरली जाते. या साखरेचे दर एक महिन्यांपूर्वी कमी होते. यात एकाएकी क्विंटलमागे ६०० रूपयांनी वाढ झाली आहे. साखरेचे एस, डबल एस आणि एम व सूपर एस असे ग्रेड असतात. यातील सुपर एस आणि एम ही साखर उत्तम दर्जाची असते. गाठी तयार करायला दाणेदार साखर उपयुक्त असते.
गाठी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालात मागील वर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढ झाली नसली तरी मजुरीचा खर्च वाढला आहे. यंदा मजुरी १५ टक्क्यांनी वाढली. बाजारात मंदी असल्याचे याचा परिणाम विक्रीवर जाणवत आहे.

Web Title: Holi sour sweetness ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.